कोरोनाचा थरार या विषयवार जेव्हा केव्हा लिहिलं जाईल तेव्हा केरळ राज्याचं नाव पाहिलं घेण्यात येईल. कारण भारतात पहिला रुग्ण या केरळमध्येच सापडला होता. या महाभयंकर आजाराला अटकाव घालण्याचा मान पण याच राज्याला मिळणार आहे. विशेष म्हणजे केरळ राज्यात कोरोनाबाधितांचा 1 मे रोजी एकही रुग्ण आढळलेला नाही. त्याचप्रमाणे सध्या जे रुग्ण या राज्यातील विविध रुग्णालयात आहेत, त्यांची सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. यामुळे केरळ राज्य अभिनंदनास पात्र आहे. या सर्वांचं श्रेय जाते तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, लोकांचा सकारात्मक सहभाग, प्रशासनावर असलेला विश्वास आणि नियमांचं कडक पालन आणि शिस्त. खरंतर केरळ राज्याचा कोरोनामुक्त होण्याच्या दिशेला असणारा प्रवास सध्याचा घडीला आदर्श म्हणून बघता येईल.


केरळची तुलना महाराष्ट्राबरोबर करता येणार नाही, परंतु काही चांगल्या गोष्टी घेता आल्या तरी त्या नक्कीच आपल्या फायद्याच्या ठरतील. केरळची लोकसंख्या आपल्यापेक्षा फार कमी आहे, तसेच तेथील साक्षरतेचं प्रमाण 100 टक्के आहे. त्याप्रमाणे तेथील भौगोलिक परिस्थिती आणि आपली भौगोलिक परिस्थिती या यामध्ये जमीन आसामानाचा फरक आहे. आपल्याकडे घनदाट लोकवस्तीच्या वस्त्या आहेत, झोपडपट्टीचे प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे.


केरळमधील मोठा वर्ग हा आखाती देशामध्ये कामाला आहे. त्यामुळे कोरोनाचा संकट जगावर ओढावलेलं असताना या बहुतांश नागरिकांनी मायदेशी यायचा निर्णय घेतला. मात्र येथील प्रशासनाने घेतल्याला खबरदारीमुळे ते कोरोनाला अटकाव करण्यात यशस्वी झाले आहे. 30 जानेवारी रोजी केरळ राज्यात देशातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. केरळमध्ये त्रिसूर जिल्ह्यात आढळलेला हा रुग्ण चीन येथील वुहान शहरातील एका विद्यापीठात शिक्षण घेत होता. तेथील प्रशासनाने तात्काळ त्यास तेथील रुग्णाचे अलगीकरण केले आणि उपचारास सुरवात केली. केरळमध्ये एकूण 497 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 392 जण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर 4 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. 101 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. केरळ हे पाहिलं राज्य आहे, त्यांनी त्यांचा कोरोनाबाधितांचा वाढत्या आलेखाची रेषा खाली आणून सरळ ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.


"या सर्व गोष्टीचं श्रेय जात ते केरळ प्रशासनाला, त्यांनी आरोग्य व्यवस्थेशी सवांद ठेवून योग्य त्या उपाययोजना केल्या आहे. तसेच लोकसहभाग ही तितकाच महत्वाचा होता. ही लढाई आम्ही सर्व एकत्र होऊन लढलो आहोत, त्याचं हे फळ आहे की केरळ आज कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर आहे", असं केरळ मेडिक काऊन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. व्ही जी प्रदीप कुमार यांनी सांगितले.


केरळ राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी त्यांनी मात्र कुठल्याही नियमात शिथिलता आणलेली नाही. उलट नवनवीन उपाययोजना करत आहेत. तेथील वित्त मंत्री थॉमस आयझॅक यांनी आपल्या ट्विटरवर काही दिवसांपूर्वी एक ट्वीट आणि छायाचित्र शेअर केलं होतं. आलापुझ्झा भागातील हे ट्वीट असून त्यात त्यांनी असं म्हटले होतं की, प्रत्येकाने घराबाहेर पडताना छत्री उघडी करून बाहेर पडावे. त्यामुळे दोन व्यक्तीमध्ये अंतर राहील, याची काळजी घ्यावी. तसेच येथे छत्री कमी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये आपोआपच सोशल डिस्टंसिंगचा अवलंब केला जाईल.


आजच्या घडीला भारतीय वैदक संशोधन परिषदेने, प्लास्मा थेरपीमध्ये फारसा विश्वास आणि यश नसल्याचे जाहीर केले आहे. तरी केरळ हे देशातील पहिले राज्य होते त्यांनी या थेरपीची सुरुवात करण्याचं सर्व नियोजन त्यांच्या राज्यातील रुग्णालयात करून ठेवलं होतं.


नर्सिंग क्षेत्रातील शिखर संस्था असणारी ट्रेण्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, या संघटनेचे अध्यक्ष, प्रोफेसर रॉय जॉर्ज सांगतात की, "येथील आरोग्य व्यवस्था मजबूत असून, येथील नर्सेसची विशेष काळजी घेण्यात येत आहे. येथे नर्सेसने रुग्णालयात काम केल्यावर घरी न जाता तेथेच प्रत्येक नर्सला राहण्यासाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली होती. सात दिवस काम केल्यावर त्यांनी काही दिवसाचा ब्रेक दिल्यानंतर पुन्हा कामावर घेतले जात असे. त्याप्रमाणे रुग्णाचा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी नर्सेसला सुरक्षित किट उपलब्ध करून देण्यात आले होते."


यावर इंडियन मेडिकल अससोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रवी वानखेडकर सांगतात की, मी अनेक वेळा डॉक्टरांच्या बैठकीनिमित्त केरळला भेट दिली आहे. या सगळ्या प्रकारात लोकांचा सहभाग फार महत्वाचा असतो आणि नेमका केरळच्या प्रशासनाने हेच ओळखलं. तेथे आरोग्य व्यवस्था, लोकांचा सहभाग आणि प्रशासन एककत्ररित्या काम करताना आढळत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर त्यांचा मोठा भर होता. एखादा व्यक्ती चुकून जरी बाहेर गावावरून त्यांच्या परिसरात राहण्यास आला तर लोकं स्वतः पोलिसांना आणि आरोग्य व्यवस्थेला त्यांची माहिती देत होते. त्यामुळे संक्रमणापासून बचाव करणं सहज शक्य होत. एवढंच काय तर एका व्यक्तीने आपला मुलगा बाहेर फिरतो म्हणून पोलिसांना तक्रार केल्याचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे पूर्वापार आरोग्याच्यादृष्टीने केरळ तसं सजग आहे. तेथील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चांगली आहे. तेथील प्रशासनाने विमानतळाजवळील सर्व ठिकाणी अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था कामाला लावली होती आणि लक्षणं दिसणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट रुग्णालयात करत होते. त्याकरिता काही येथील शासनाने या कामांकरिता शासकीय आणि खासगी रुग्णालयाशी सामंजस्य करार केला होता. विमानतळावर व्यवस्थितपणे आरोग्याची तपासणी करून गरज भासली तर त्यास हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाईन करत होते."


ते पुढे असेही सांगतात की, "तेथे खासगी आणि शासकीय डॉक्टर्स प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नित्यनियमाने रोज नियोजन करत होते. ज्यांना अन्नधान्य हवे आहे त्यांना घरपोच करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक नागरिक या कोरोनाच्या या युद्धात सहभागी झालेला येथे दिसत होता. कमालीची शिस्त या राज्यात दिसून येते."


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग