सरकारने शक्यतो साऱ्या सूचना देऊन झाल्यात, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सर्वच जणांनी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलंय की घराबाहेर पडू नका. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळा, गरज असल्यास बाहेर पडा. शासनाचा मूलमंत्र खूप लोकांनी अंमलात आणलाय खरा, तरीही काही टगे अजूनही बाहेर विनाकारण हुंदडतायत. पोलीस त्यांचा कार्यंक्रम व्यस्थित करतायत. सरकारने सांगूनही अत्यावश्यक सर्व सेवा सुरळीतपणे सुरु राहणार आहे, तरीही लोक गर्दी करत भल्या मोठ्या रांगा लावत सुपरमार्केट बाहेर गर्दी करतायात. भाजीवाल्याकडून ज्यापद्धतीची भाजी उपल्बध आहे ती विकत घेतायत, इतर वेळी हे बरोबर नाही, 'ते नको हेच दे' असा घासाघीस करणारा तमाम वर्ग निमूटपणे मिळेल ते पिशवीत कोंबत होता. कितीही गोष्टी विकत घेऊन ठेवल्या असल्या तरी अनेकांचा बाहेर जाण्याचा मोह काही सुटत नाही. सध्या जो माणूस घरात शांतपणे बसून विविध गोष्टीत आपलं मन रमवून घेतोय त्याला सध्या सुजाण 'प्रतिष्ठित' असं म्हटलं जातंय.


काय दिवस आलेत, या काळात आपण आपल्या स्वतःच्या घरी असणे याला 'स्टेटस सिम्बॉल' प्राप्त झालय. काही लोकांची तर जणू समाजमाध्यमवर स्पर्धा लागली आहे, कसे आपण आपल्या स्वतःच्या घरात राहून विविध खेळ खेळतोय, घरी कुटुंबियांना मदत करतोय याचे फोटो अपलोड केले जातायत. खरं तर ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे का होईना सर्वच जण आपल्या घरात आहेत. त्यामध्येच, (अत्यावश्यक सेवा मध्ये नसलेल्या ) जर कुणी व्यक्तीने सांगितलं की तो घराबाहेर जाऊन काम करतोय तर त्याला उपदेशाचे डोस वेळप्रसंगी शिव्यांची लाखोली वाहिली जात असल्याचे प्रकारही घडताना दिसत आहे. एकंदरच काय तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरात बसणे आणि गर्दी टाळणे हा मूलमंत्र अख्या देशाला दिला गेला आहे.

पंतप्रधानांनी जसं पहिल्यांदा कोरोना विषयी देशाला संबोधून भाषण केलं होतं ना तेव्हा जसा घंटा-थाळी नाद करायला सांगितलं होतं, तसं त्यांनी त्यावेळी सोशल डिस्टंसिंग ह्या प्रकारचा अवलंब करायला सांगितला होता. तसेच पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा कोरोना विषयी देशाला संबोधून भाषण केले, तेव्हाही त्यांनी सोशल डिस्टंसिंग ह्या मुद्द्यावर जोर दिला. त्यामुळे ह्या मुद्द्याचं महत्व मानून जनतेने आता शांत बसण्याशिवाय पर्याय नाही आणि गर्दी टाळणं, हे वेळीच ओळखले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना, यांच्या मते सोशल डिस्टंसिंग म्हणजे नागरिकांनी एक मीटर किंवा तीन फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून जर समोरची एखादी व्यक्ती खोंकली किंवा शिंकली तर त्यांच्यातून निघणाऱ्या द्रव्याचा तुम्हाला संसर्ग होणार नाही. यामागे एकच उद्देश असतो की एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये. जास्त नागरिक एकमेकाच्या संपर्कात येऊ नये.

होम कॉरंटाईन हे बंधन मानून जगलात तर मनावर मानसिक दडपण येईल, त्याच्या विचारात दिवस घालवू नका. उगाचच स्वतःची चीड-चीड करून न घेता मोकळा श्वास घेण्याची तयारी करा, इतके दिवस आपल्याला इतकी मोकळीक मिळाली नव्हती. काही जणांना तर 'मंडे ब्लूज' ची स्वप्न पडत असायची, कधी शुक्रवार येतील याची ते वाट पाहत राहायचे. बहुतांश हीच लोकं घरी करमत नसल्याच्या तक्रारी करताना आज दिसत आहेत. अनेकवेळा कुटुंबवत्सल कसे असावे याच्या कहाण्या सांगणारे घरातून पळ कसा काढता येईल याच्यावर विचार करताना दिसत आहे. मात्र, यामध्ये आशादायी चित्र असे की, नाकं मुरडून का होईना आज ते सर्वजण घरी बसून निवांत वेळ घालवीत आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या देशामध्ये वाढत आहे, फारच कमी स्थानिक लोकांना या संसर्गाची लागण झाली आहे ही खरी तर आनंदाची बाब आहे. बहुतांश आपल्याकडे जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत त्याचा परदेशी प्रवासाचा संबंध आहे त्यामुळे त्यांना या संसर्गाची लागण झाली आहे. या विषाणूच्या संसर्गाची सामाजिक लागण होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. इटली देश इकडेच चुकला, त्यामुळे त्यांच्या देशात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या देशाला फार उशिरा होम कॉरंटाईनच महत्व कळालं तोपर्यंत बरसं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं आणि तेथे विनाशकालीन परिस्थिती आज उदभवली आहे. आपल्या देशांने निदान वेळॆत पावले उचलली असून सगळ्याना होम क्वारंटाईनचा जो संदेश दिला आहे, तो आपल्या देशहिताकरीता असून त्याचा आपण सगळ्यानी मिळून पालन केलं पाहिजे.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क

BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...

BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!

जियेंगे तो और भी लढेंगे!

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?

BLOG | आरोग्यसेवेतून राष्ट्रसेवाच...

कोरोना आणि कोविड-19‬