ज्या गोष्टीसाठी आरोग्य यंत्रणेचे सातत्त्याने प्रयत्न सुरु आहेत ते म्हणजे मृत्यू दर कमी करणे. जर डिसेंबर महिन्यापर्यंत कोरोनाच्या अनुषंगाने प्रसिद्ध होणारा दैनंदिन अहवाल पाहिला तर लक्षात येतं की राज्यातील मृत्यूदर बऱ्यापैकी कमी झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात कायम जास्त मृत्यू दर असणाऱ्या मुंबई शहरातही हे वास्तव आता सत्यात उतरले आहे. गेले अनेक महिने मुंबई शहरातील मृत्यूदर दोन आणि तीन आकडी असा होता. प्रथमच या महिन्यात चार वेळा मुंबई शहराचा मृत्यूदर एक आकडी झाला आहे. अख्ख्या देशात कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या मुंबई शहरातील रुग्णसंख्येने आणि मृत्यूदराने सगळ्याचं लक्ष आकर्षित करून घेतलं होतं. अजूनही मुंबई शहराला सुधारणा करण्यासाठी बराच वाव आहे, विशेष म्हणजे मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षाही कमी करण्याचे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागणार आहे. सध्या रुग्णसंख्या जरी मोठी दिसत असली तरी खासगी आणि महापालिका तसेच शासकीय आरोग्य यंत्रणा मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झालं आहे.


राज्याचा आरोग्य विभाग रोज कोरोनाच्या रुग्णांबाबत आकडेवारी जाहीर करत असतो. त्यानुसार, 15 डिसेंबर रोजी राज्यात 4 हजार 395 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 3 हजार 442 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 70 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या पंधरवड्यात 1, 8, 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबई शहरात मृत्यूचा दर एक आकडी राहिला आहे. गेल्या काही महिन्यात मुंबई महापालिकेने, विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या मोहीमेतून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणं, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधांचा साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणायला मदत झाली आहे. प्रशासनाने 22 जून रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता.


राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात की, "गेल्या काही दिवसात आपल्याकडे कोरोनाच्या आजाराविरोधातील चांगली उपचार पद्धती विकसित झाली आहे. रुग्ण वेळेवर आल्यास रुग्णांना योग्य उपचार दिले जातात. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण पहिल्यापेक्षा खूप कमी झाले आहे. यामुळे रुग्ण जरी नव्याने निर्माण होत असले तरी ते बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. नागरिकांनी फक्त या आजारांची लक्षणे दिसताच वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.


मृत्यूदर कमी झाला असला तरी या आजाराचा प्रादुर्भाव कायम असल्याचं आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी आता हा आजार होऊ नये यासाठी सुरक्षितेचे नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत. कारण सध्या तरी ह्या आजारांपासून वाचायचं असेल तर मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं आणि हात स्वच्छ धुणे हेच एकमेव शस्त्र आहे. अनेकजण आजही या नियमांचं पालन करत नाहीत. राज्यात विविध ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु आहे. अनेक नागरिक या कारवाईत सापडत आहेत, हे नक्कीच चांगलं लक्षण नाही. शासनाने दिलेल्या सुरक्षिततेचे पालन प्रत्येक नागरिकांनी केलेच पाहिजे कारण यामध्ये नागरिकांचे आरोग्य चांगले राहणे हा एकमेव उद्देश आहे. आजाराचा संसर्ग वाढत जाणे आणि रुग्णबाधित रुग्ण बरे होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाबाधित बरे होत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, त्याचवेळी संसर्गाचा फैलाव होऊन नवीन रुग्णाचे निदान होणे ही गोष्ट आपण येथे ध्यानात घेतली पाहिजे. ह्या संसर्गाला अटकाव करण्याची जबाबदारी एकट्या प्रशासनाची नसून त्यात मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांचा सहभाग असणं अपेक्षित आहे.


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे सांगतात कि, "मुळातच आजाराची तीव्रता कमी झाली आहे असे वाटते. तसंच रुग्णांना वेळेत उपचार मिळत आहे. मुळात याकरिता रुग्ण वेळेत येत आहे हे त्याहून महत्त्वाचे कारण. मागच्या काळात पाहिले तर रुग्ण गंभीर झाल्यावरच रुग्णालयात येत असत. त्यावेळी शर्थीचे प्रयत्न करूनही रुग्ण दगावत असे. आता मात्र तसं होताना दिसत नाही. आपल्या डॉक्टरांना चांगलेच कळले आहे की कोणता रुग्ण आल्यावर त्याला कोणत्या प्रकारची औषधे द्यायची. त्याचाच हा सगळं एकंदर परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे. यापेक्षाही आपण मृत्यूदर आणखी कमी करू शकतो, त्यादृष्टीने प्रयत्न अजूनही सुरु राहतीलच. तसेच आम्ही जेव्हा कोरोनाच्या मृत्यूचे विश्लेषण करतो त्यावेळी पाहतो, की जो रुग्ण दगावला आहे तो वाचू शकत होता का? कोणत्या प्रकारचे उपचार त्याला मिळाले? तो आला तेव्हा त्याच्या आजाराची तीव्रता किती होती. त्याला योग्य उपचार मिळाले का? हा सर्व अभ्यास आम्ही करतो आणि त्यानुसार योग्य सूचना शासनाला देत असतो.

सध्याची परिस्थिती पाहता, मृत्यूदर रोखायचा कसा? या प्रश्नाचे उत्तर आरोग्य यंत्रणेला मिळाले आहे. आता प्रश्न आहे ही परिस्थिती आणखी किती काळ टिकते हे पाहणे गरजेचे आहे. कारण सध्याच्या क्षणाला अजूनतरी या आजाराविरोधात असणारी लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. ती नेमकी कधी येईल यावर कुणी अजून ठोस उत्तर दिलेले नाही. मात्र, ती लवकरच येईल असे संकेत या विषयातील तज्ञ मंडळींनी दिली आहे. लस बाजारात आली तरी ती सर्व सामान्यांना मिळण्यास नक्कीच काही वेळ वाट पाहावी लागेल. कारण ही लस सर्वात आधी कोणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.


तर राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांच्या मते मृत्यूदर कमी होतोय ही नक्कीच चांगली बाब आहे. कारण कोणत्याही साथीच्या आजारात मृत्यू कमी होण्यासाठी आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असते. यामुळे आपल्याकडे असणारी कोरोनाची पहिला लाट ओसरतेय असे म्हणायला नक्कीच वाव आहे. त्याशिवाय अशाच पद्धतीने आपल्याकडे प्रयत्न होत राहिले तरी आपण लवकरच या आजाराला थांबविण्यात यशस्वी होऊ शकतो. मृत्यूदर आणि चाचण्या किती होतात याचा काही संबंध नाही. त्यामुळे हे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचे एकत्रित यश आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग