BLOG : जु 'लेह' लडाख : (भाग 6) नुब्रा व्हॅली - सौंदर्यवान खोरं
लडाख... या शब्दाचा अर्थच आहे ‘लँड ऑफ पासेस’ म्हणजे दऱ्या-खिंडींचा प्रदेश. इथल्या पर्वतांमध्ये लडाखी संस्कृतीनं आकार घेतला. सामान्य जगापासून उंच ठिकाणी वसलेल्या या थंड प्रदेशात असमतोल जमीन, पाण्याचे मर्यादित स्त्रोत, भीमकाय पहाडांचा कोरडेपणा रोजच जगण्याला आव्हान देत असतो. अशा या बिकट परिस्थितीतही लडाखी लोकांचं जगणं अनेक रंगांनी बहारदार केलं आहे. नद्यांच्या आशीर्वादानं इथले खोरे समृद्ध झाले. सिंधू सोबत लडाखच्या उत्तरेकडे वाहणाऱ्या नुब्रा नदीच्या काठी लडाखची संपन्नअमेोललअमता नजरेत भरते. उत्तर-पश्चिमेला वाहणाऱ्या श्योक नदीला तिची सखी नुब्रा नदी येऊन मिळते. श्योक आणि नुब्रेच्या या संगमावरच नुब्रा व्हॅली वसली. नुब्राचं पारंपरिक नाव डुमरा आहे. डुमरा म्हणजे फुलांचं खोरं (valley of flowers). पहाडांच्या कपारींमधून अखंड वाहणारे झरे, झुळझूळ आवाज करत अहोरात्र प्रेमाचा ओलावा पसरवणाऱ्या नद्या, नद्यांकाठी वसलेली छोटी छोटी गावं आणि प्राचीन बौद्ध मठ हे नुब्रा व्हॅलीला स्वप्ननगरीमध्ये परावर्तीत करतात. लडाखला समजून घ्यायचं असेल तर नुब्रा व्हॅलीला जावंच लागतं.
नुब्रा व्हॅलीच्या प्रवासाची सुरुवात लेहपासून झाली. लेहपासून उत्तरेकडे 160 किमी अंतरावर नुब्रा व्हॅलीला जाण्यासाठीचा रस्ता अतिशय उत्तम आणि सुस्थितीत आहे. त्यामुळे बाईकर्ससाठी ही मोठी पर्वणी असते. आम्ही मात्र आज बसने जाण्याचा निर्णय घेतला. तसे लेहमध्ये येणारे 99 टक्के पर्यटक हे प्रायव्हेट कार, रेन्टेड कार, टुरिस्ट कंपन्यांच्या कार, प्रायव्हेट बसेस किंवा बाईकने जातात. एक टक्काच आमच्यासारखे प्रवासी असावेत जे गव्हर्नमेंटच्या बसनं प्रवास करतात. त्याचं कारण असं आहे की, नुब्रा व्हॅलीला लेहवरून रोज सकाळी फक्त एकच बस जाते. त्या बसमध्ये आम्ही मोजून 15 ते 20 लोक होतो. त्यातही पर्यटक म्हणावे असे फक्त आठ ते दहाच जण होते. सकाळी 8 वाजता ही बस लेहवरून नुब्राकडे निघाली. वळणं घेत डोंगरावर पोहोचलेल्या बसमधून संपूर्ण लेह शहर दिसतं. ऐसपैस घरं, मोठे रस्ते, निवांत हालचाली, घरासमोर डोलणारी सफरचंदाची झाडं, नदीकाठच्या परिसरात उंचच उंच पहाडांशी शर्यत लावणारी देवदारची झाडं. एरवी शहर फिरताना जे नजरेतून सुटलं होतं ते सगळं आज बसमधून दिसत होतं. बसमध्ये वर लावलेल्या टेप रेकॉर्डवर जोरदार लडाखी गाणी लागली होती. एकूणच पुढचा प्रवास आनंददायी होणार याची खात्री होती.
लेहकडून नुब्राकडे जाताना पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे खार्दुंगला पास. साधारण 40 किमीवर खार्दुगला गावाजवळचा हा रस्ता जगातला सर्वात उंच वाहन चालवण्यायोग्य (worlds highest motorable road) रस्ता आहे. मी अक्षरशः गव्हर्नमेंटच्या बसमधून ढगांची सफर करत होतो. आता जगातला सर्वात उंच रस्ता म्हटल्यावर तिथे सगळ्यालाच ग्लॅमर आहे. म्हणजे जगातलं सर्वात उंच रेस्टॉरंट, जगातलं सर्वात उंच मंदिर वगैरे वगैरे. पण खरंच एवढ्या उंच पहाडावर उत्तम रस्ता तयार केल्याबद्दल बीआरओचे (Border Road Organisatin) आभारच मानले पाहिजे. सहसा प्रवाशांना माहितीही नसतं की, आपण ज्या रस्त्यांवरुन जात आहोत त्या रस्त्यांसाठी अनेक जण कंबरतोड कष्ट घेत असतात. लेहमध्ये मिलिटरीइतकीच मेहनत बीआरओ घेत आहे. लेहवरून पँगाँगकडे जात असताना रस्त्यात अनेक ठिकाणी हे कामगार थंडी आणि उन्हात काम करताना दिसतात. पोकलेन, बुलडोझर उंचच उंच डोंगराच्या टोकावर नेऊन पहाडाला कोरुन काढतात. मग तो ढिगारा बाहेर काढला जातो. बरं हे सगळे 15 मिनिटं काम करुन पुन्हा रस्ता स्वच्छ करतात आणि थांबवलेल्या वाहनांना वाट मोकळी करुन देत असतात. 15 मिनिटाच्या अंतरानं पुन्हा तिच प्रोसेस होत असल्यानं रस्ते तयार करण्याचं कामही सुरु राहतं आणि वाहनंही अडकून पडत नाही.
खार्दुंगला पासवरून खाली आल्यानंतर पुढचा टप्पा खालसर. लेहपासून 120 किमी अंतरावर खालसर नावाचं गाव आहे. इथून रस्त्याला दोन फाटे फुटतात. एक रस्ता सरळ सुमूरमार्गे पानामिकला जातो. दुसरा रस्ता डावीकडे डिस्किट आणि हुंडर या नुब्रा व्हॅलीतल्या गावांकडे वळतो. डावीकडे वळण घेतल्यानंतर देवाच्या किमयेची अनुभुती यायला लागली. हिरव्यागावर गालिचांवरची आखिव रेखीव गावं. श्योक नदीच्या पाण्यानं बहरलेले मळे, कुरणावर ताव मारुन झाल्यावर रवंथ करत बसलेले याक (yak), एखाद्या नामवंत चित्रकारानं फुरसतीनं काढलेलं चित्र जणू निळ्या आभाळवर टांगलं असावं, इतका देखणा नजारा. पुन्हा पुन्हा मी त्या नदीचं, त्या निश्चल पहाडांचं वर्णन किती वेळा करावं. जमेल तेव्हढं ते मी जगून घेतलं. रुंद रस्त्यांवरून जसा बसनं वेग घेतला तसं घडोघडी दृश्य बदलत होतं. प्रकृतीनं जणू अल्बमच माझ्यासमोर ठेवला होता. श्योक नदी एखाद्या रत्नहारासाठी भासत होती. नदीच्या काळावर मोठाले पांढरे शुभ्र दगड आणि छोटे रंगीबेरंगी दगड, नीलमणी हे सौंदर्य आणखीच खुलवत होते.
नुब्रा व्हॅली समुद्र सपाटीपासून 10 हजार फूट उंचीवर असल्यानं इथेही काही जणांना श्वास घेताना त्रास होतो. भारतीय सैनिकांचे तळ या प्रवासातही जागोजागी दिसले. नुब्रा व्हॅलीचा भाग उत्तरेकडे पाकव्याप्त भारत आणि पूर्वेकडे चीनला जाऊन मिळतो. या दोन्ही उपद्रवी राष्ट्रांचा धोका असल्यानं सैन्यदल इथे कायम सतर्क असतं. पनामिकहून पुढे गेल्यावर सियाचीन ग्लेशियर्सवर आपले सैनिक रक्त गोठवणाऱ्या थंडीत उभे आहेत. कारगिलच्या युद्धानंतर हा प्रदेश तसा बऱ्यापैकी शांत आहे. आता तर रस्ते गुळगुळीत असल्यानं डोंगर दऱ्या, नदी ओलांडून यायला फार वेळ लागला नाही. चार ते पाच तासात आम्ही डिस्किटला पोहोचलो.
डिस्किट हे नुब्रा व्हॅलीतलं महत्वाचं गाव. श्योक नदीच्या काठावरच्या या गावाची वस्ती अगदीच थोडकी. बसमधून उतरल्यावर आम्ही होम स्टे गाठलं. नदीकाठी छान मोठा बंगलाच होता तो. नुब्रा व्हॅलीत तर पोहोचलो पण फिरण्यासाठी आम्हाला टू व्हीलर हवी होती. होम स्टेच्या मालकाचं नाव ताशी होतं. ताशीकडे आम्ही टू व्हीलरची चौकशी केली. तर त्यांनी सांगितलं की, "डिस्किटमध्ये तुम्हाला कुठेही टू व्हीलर मिळणार नाही." आता माझी पंचाईत झाली होती. पण ती समस्याही काही मिनिटात सुटली. घरमालक म्हणाला “आप टेन्शन मत लो, यह मेरी कार है, मेरा दोस्त आपको घुमा ले आएगा.” पुन्हा एकदा मला इथल्या माणसांमधला गोडवा अनुभवता आला. लगेच तासाभरात तयार होऊन आम्ही हुंडर सँड ड्युन्सकडे (पांढऱ्या वाळूचं वाळवंट) निघालो.
हुंडर गाव ओळखलं जातं ते इथल्या दोन कुबड असलेल्या उंटांसाठी. यांना बॅक्ट्रियन उंट म्हणतात. नुब्रा व्हॅली वगळता हे उंट लडाखमध्ये इतर ठिकाणीही फार दिसत नाहीत. जगातल्या या उंच वाळवंटात हेच बॅक्ट्रियन उंट वाहतुकीचं महत्वाचं साधन होते. हल्ली फक्त पुस्तकात आणि इतिहासातच वाचायला मिळणारा ऐतिहासिक रेशिम मार्ग (सिल्क रूट) याच नुब्रा व्हॅलीतून जात होता. चीन, मंगोलिया, यारकंद, उझबेकिस्तान, कझाकस्तान यांसह मध्य आशियाई राष्ट्रांमधून माल वाहतूक करण्यासाठी या उंटांची मदत व्हायची. जेव्हा लडाखमध्ये रस्ते नावालाही नव्हते तेव्हा याच बॅक्ट्रियन उंटांच्या खांद्यांवरून लडाखनं समृद्धीचा राजमार्ग शोधला. आज हे उंट फक्त शोभा म्हणून उभे असतात. हुंडरच्या पांढऱ्या शुभ्र वाळूवर उंट सफारीचा आनंद देतात.
बॅक्ट्रियन उंटांप्रमाणे लडाखमध्ये याक आढळतात. लडाखच्या ओबडधोबळ रस्त्यांवर जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती तेव्हा हेच याक आपल्या पाठीवर सामान वाहून नेण्याचं काम करायचे. मादी याकचं दूध इथल्या लोकांसाठी अमृतासमान आहे. याक हा प्राणी थंड प्रदेशातच जगू शकतो. त्यामुळे तिबेट, लडाख या भागातच याक आढळतात. चमरी किंवा सुरागाय या नावानंही याकला ओळखलं जातं.
हुंडरवरून आम्ही परत डिस्किटकडे निघालो. रस्त्याच्या दुतर्फा जर्दाळू, अक्रोड आणि सफरचंदाच्या बागा दिसल्या. पर्यटकांव्यतिरिक्त लडाखी लोकांच्या आयुष्यात उत्पन्नाचं एक महत्वाचं साधन इथली शेती आहे. खुबानी म्हणजेच जर्दाळू इथलं महत्वाचं पीक. लडाखच्या या वाळूमिश्रीत मातीत शेतीचे पर्यायही मर्यादीत आहेत. पण खुबानीनं इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात साखरपेरणी केली आहे. लडाखच्या जर्दाळू आणि सफरचंदाची आखाती देशात प्रचंड मागणी आहे. जर्दाळूचे ज्यूस, तेल, चॉकलेट असे अनेक पदार्थ बारमाही मिळतात. इथल्या लेह बेरी आणि द्राक्षे या पिकांबद्दलही बरंच ऐकलंय. पण या प्रवासात आम्हाला लेह बेरीची बाग बघता आली नाही. डिस्किटला पोहोचल्यावर कॉर्नरला काही महिला ताजे जर्दाळू आणि सफरचंद विकताना दिसल्या. इथल्या सफरचंदाचा आकार आणि रंगही वेगळा आहे. जर्दाळू आणि सफरचंद असा लडाखी रानमेवा खाऊन आम्ही डिस्किटच्या मठात पोहोचलो.
डिस्किटचा हा बौद्ध मठ लडाखचं वैभव आहे. हा मठ 14 व्या शतकातला असल्याचं बोललं जातं. 2010 साली इथल्या पहाडावर 104 फूट उंच मैत्रेय बुद्धाची मूर्ती उभारण्यात आली. स्वतः तिबेटी गुरु दलाई लामा यांच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं होतं. डोळे दिपवणारं मैत्रेय बुद्धाचं हे रुप जगभरातल्या पर्यटकांना इथे यायला भाग पाडतं. नुब्रा परिसरातली शांतता कायम राहावी, शत्रूंपासून रक्षण व्हावं यासाठी ही मूर्ती उभारली असल्याचं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. मैत्रेय बुद्धाला भविष्यातला बुद्धही मानलं जातं. तिबेटी बौद्ध परंपरांनुसार भविष्यात मैत्रेय बुद्ध जन्म घेतील आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत जगाला पुन्हा प्रेमाचा संदेश देतील अशी इथल्या लोकांची धारणा आहे. ते काहीही असलं तरी मैत्रेय बुद्धाची मूर्ती फक्त बघत राहावी अशीच आहे. संध्यासमयी संधीप्रकाशात बुद्धाची हसरी मूर्ती उजळून गेली होती.
होम स्टेला परत आलो तेव्हा अंधारलं होतं. नुब्रा व्हॅलीमध्ये लोड शेडिंग मोठ्या प्रमाणावर असतं. इथल्या घरांमध्ये एसी किंवा पंखे सुद्धा फारच अभावाने दिसतात. पर्याय म्हणून सोलारचं जाळं पसरलंय. गेल्या काही वर्षांपासून लडाखच्या अनेक भागात विद्युतीकरणावर भर दिला जात आहे. लेह ते कारगिल या भागात वीज पोहोचवण्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालंय. नुब्रा व्हॅली, पनामिक, सियाचीन या दुर्गम खोऱ्यातल्या काही गावांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही. पण लडाखला केंद्रशासित घोषित केल्यानंतर लडाखमध्ये रस्ते आणि वीज यांवर जास्त भर दिल्या जात असल्याचं ताशीच्या बोलण्यातून जाणवलं. ताशी आता आमचा छान मित्र झाला होता. लडाखी बैठकीतल्या किचनमध्ये त्यानं आम्हाला मस्त गरमागरम जेवायला घातलं.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा परतीच्या मार्गावर निघालो. डिस्किटच्या बस स्टॉपवर पोलंडची आगा सारझॅन्स्का भेटली. गेल्या महिनाभरापासून ती लेहमध्येच फिरत होती. पुढचा आणखी एक महिना ती इथेच राहणार होती. अनेक देशांमध्ये फिरल्यानंतर तिला आता भारत जाणून घेण्याची कमालीची इच्छा होती. लेहमध्ये लगेज सोडून ती दोन कपडे बसतील एवढीशी छोटी हॅन्डबॅग घेऊन आठवडाभरासाठी नुब्रा व्हॅलीत फिरत होती. अत्यंत कमी साधनांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टमधून लडाखला जाणून घेत आपला फोटोग्राफीचा छंद ती जोपासत होती. खूप गप्पा झाल्या, लडाखी लोक, खान-पान, संस्कृती, इतिहास याबद्दल तिला एखाद्या भारतीयापेक्षाही विस्तृत माहिती होती. नऊ महिने शिक्षिकेचं काम आणि नंतर तीन महिने जमेल त्या देशात जाऊन मनसोक्त फिरायचं. मनोमन हेवा वाटला तिचा.
लेहची बस आली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, लेहच्या त्या अतिशय सामान्य बसमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रवासी परदेशातले होते. अगदी विशी पंचविशीतल्या तरुणांपासून ते 75 वर्षांच्या आजोबांपर्यंत. युरोप आणि इस्राईलचे टुरिस्ट लडाखमध्ये जास्त दिसतात. आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी लेहमधून फिरत होते तेव्हा सगळीकडे फक्त इस्राईली तरुणच दिसत होते. इस्राईलमध्ये सर्व तरुणांना 18 ते 21 असे तीन वर्ष सैन्यदलात कम्पलसरी काम करावंच लागतं. तीन वर्षांनंतर जेव्हा हे तरुण मोकळे होतात. तेव्हा त्यांच्या हातात पैसा आणि वेळ दोन्ही असतो. त्यामुळे मोठ्या संख्येनं इस्राईली तरुण विविध देशांमध्ये फिरतात. अगदी सहा-सहा महिने भारतात राहून अख्खा भारत एका दमात बघणारेही काही जण असतात. त्यामुळे महागडे हॉटेल्स, रेन्टेड कार्स त्यांनाही परवडतही नाही. शक्य तितका स्वस्तात प्रवास करत स्थानिक लोकांमध्ये मिसळून आपल्या टूरचा आनंद घेत असतात.
लेहकडे बस निघाली. लडाखी माणसं, प्रवासात भेटलेले सवंगडी, हा सर्वस्व उधळून देत आनंद देणारा निसर्ग बघितल्यावर अनेक विचार डोक्यात घोळत होते. प्रत्येक प्रवासात आपल्या हातात काहीतरी सापडतं. या प्रवासानं मला आहे त्या परिस्थितीत उभं राहण्याची जिद्द शिकवली. आहे त्या गोष्टींमध्ये सुख मानत जगणं कसं सुंदर करता येईल याचा विचार करायला शिकलो. निसर्ग आणि परिस्थिती ही माणसाच्या हातात नसते, त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं. लडाखच्या लोकांचा संघर्ष बघितल्यानंतर आपल्या जीवनाचा संकर अगदीच सामान्य वाटू लागतो. त्यांच्यासारखं गोड हसत जुलेह म्हणत जगण्याशी दोन हात करण्याची प्रेरणा मिळाली. लडाखच्या या प्रवास मंथनातून सकारात्मकतेची अमृतऊर्जा आयुष्यभराची शिदोरी ठरणार आहे.