Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Suhas kande vs Chhagan Bhujbal : भुजबळांना शह देण्यासाठी कांदे समर्थकांकडून सुहास कांदे यांचा भावी पालकमंत्री असा बॅनर लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. राज्यात सध्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा रंगली असतानाच आता नाशिकमध्ये पालकमंत्री कोण होणार? याबाबत चढाओढ सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी (Guardian Minister) आग्रही असतानाच आता सुहास कांदे (Suhas Kande) यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी 14 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. त्यातच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ या लढतीची राज्यभरात चर्चा झाली. नाशिकमध्ये कांदे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष नाशिककरांना पाहायला मिळाला. नांदगावमध्ये सुहास कांदे यांनी 90 हजारांच्या फरकाने निवडून येत छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांचा पराभव केला.
भुजबळांना शह देण्यासाठी कांदेंचा बॅनर?
आता सुहास कांदे यांचा नाशिक जिल्ह्याचे भावी पालकमंत्री असा बॅनर नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. या बॅनरची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव देखील अग्रस्थानी आहे. तर दुसरीकडे भुजबळांना शह देण्यासाठी कांदे समर्थकांकडून सुहास कांदे यांचा भावी पालकमंत्री असा बॅनर लावला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे आता पालकमंत्रिपदावरून कांदे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष पुन्हा पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवयानी फरांदेंचेही झळकले बॅनर
दरम्यान, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांचे देखील भावी पालकमंत्री असे बॅनर दिसून आले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादा भुसे यांचे नाव चर्चेत असतानाच देवयानी फरांदे यांचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या