Shubhangi Gokhale on Chhaava: 'छावा' सिनेमातील सुव्रतच्या निगेटिव्ह भूमिकेवर सासुबाई शुभांगी गोखलेंची प्रतिक्रिया; 'त्याला बघून खूप राग येतो...'
Shubhangi Gokhale on Chhaava Suvrat Joshi: आता सुव्रत जोशीच्या 'छावा' मधील भूमिकेबद्दल त्याच्या सासूबाई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घ्या सविस्तर.

मुंबई: बॉक्स ऑफिसवर अद्यापही विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धडाक्यात कमाई करत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून, रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. विशेषतः अभिनेता सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांच्या निगेटिव्ह भूमिकांची जोरदार चर्चा आहे. अशातच आता सुव्रत जोशीच्या 'छावा' मधील भूमिकेबद्दल त्याच्या सासूबाई आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, जाणून घ्या सविस्तर.
शुभांगी गोखलेंची प्रतिक्रिया
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी नुकतीच एका युट्युब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या वेळी, त्यांना 'छावा' चित्रपट रिलीज झाला आहे आणि सुव्रत या चित्रपटाचा एक भाग आहे, त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शुभांगी गोखलेंनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'खूप अभिमान वाटतो. याचं कारण, सुव्रत एक उत्तम नट आहेच आणि तो आणखी मोठ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे. चित्रपटात त्याचा निगेटिव्ह रोल आहे. सारंग आणि त्याला बघून लोकांना खूप राग येतो, चीड येते. हेच त्यांचं यश आहे आणि त्या दोघांनी ते करणं खूप महत्वाचं होतं.' 'छावा' चित्रपट लक्ष्मण उतेकरांनी खूप कष्ट घेऊन बनवला आहे. त्यामुळे 'छावा' लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे,' असंही पुढे शुभांगी गोखलेंनी म्हटलं आहे. दरम्यान, 'छावा' सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आहे, या सिनेमाने पहिल्याच दिवसापासून मोठी कमाई केली आहे. या सिनेमाने 28 व्या दिवशी 3.96 कोटी रूपयांची कमाई केली आहे, ज्यामुळे एकूण कलेक्शन 553.22 कोटी रुपये इतकं झालं आहे.
बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांमध्ये छावा
शाहरुख खानचा जवान हा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याने 640.25 कोटी रुपये कमवले आहेच. यानंतर स्त्री 2 या चित्रपटाने 597.99 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा अॅनीमल आहे ज्याने 553.87 कोटींची कमाई केली आहे. छावा यात थोडा मागे आहे, फक्त 1 कोटी रुपये अधिक कमावल्यानंतर छावा टॉप 3 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये समाविष्ट होईल.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंग आणि अक्षय खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर रिलीज झालेला हा चित्रपट जवळपास 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.






















