BLOG | मास्क हेच आता टास्क
मास्क न घालणे म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःला तर धोका आहेच परंतु त्यामुळे इतर व्यक्तींनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या व्यक्ती पासून दूर राहा.
चले भैया काम पे, पहने प्यांगोलिन मास्क, पद्रहं घंटे, काम है करना, यही अपना टास्क !
महानायक अमिताभ बच्चन यांनी बुधवारी दिवसाची सुरुवात करताना समाजमाध्यमांवर ह्या ओळी टाकून स्वतःचा मास्क घातलेला फोटो ट्विट केला आहे. त्यांनी या संदेशातून सर्व त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांना मास्कचे महत्त्व पटवून दिले आहे. संपूर्ण विश्वातून सध्या स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर नाका-तोंडावर मास्क लावणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक आरोग्य परिषदेने आणि वैद्यकीय तज्ञांनी अनेकवेळा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मास्कचे महत्त्व अधोरेखित केले आहे. का कुणाला ठाऊक काही लोकांना मास्क लावायला काय समस्या आहे, कळत नाही. बाजारात उत्तम प्रकारचे मास्क आले आहेत ज्यामुळे गुदमरायला होत नाही. काही जणांनी घरीच चांगले कापडी मास्क बनवून वापरण्यास सुरुवात केली आहे. मास्क ही गोष्ट लहान जरी वाटत असली तरी नागरिकांना थेट कोरोना सारख्या भयंकर अशा संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी तुमची मदत करते. सध्याच्या या वैश्विक महामारीत वैद्यकीय अनुषंगाने मास्कला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येणारा काळ हा कठीण आहे तंदुरुस्त राहायचे असेल तर मास्क वापरावाच लागेल नाही तर संपूर्ण राज्यात आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे.
राज्यातील विविध शहरात बाजारात फेरफटका मारला तर कुणाच्याही लक्षात येईल की लोकांच्या मास्क घालण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा आहेत. काही नागरिक नाक - तोंड सोडून म्हणजे ज्याच्यावर मास्क लावायचा हा भाग सोडून मास्क घालून हिंडत असतात. हनुवटीवर मास्क लावणाऱ्याची संख्या जास्त आहे. काही जण मास्क एका कानात लटकवत त्यांची दैनंदिन कामे करत असतात, तर काही नागरिकांना मास्क म्हणजे मफलर वाटायला लागली आहे अशा पद्धतीने तो मास्क गळ्यात लटकवून आपण कसे मास्क लावून सुरक्षिततेचे नियम पाळत आहोत या अविर्भावात वागत असतात. ह्या सगळ्या महाभागांकडे बघितलं की वाटते ते अशा पद्धतीने मास्क घालून समजावर उपकारच करत आहे. सहा महिने झाले कोरोनाचा राज्यात प्रसार होऊन आता मास्क कसा लावावा त्याची विल्हेवाट लावावी यासाठी मास्क साक्षरता आणणे काळाची गरज ठरू पाहत आहे. अनेक नागरिक आपल्या सोयीनुसार वाटेल त्या पद्धतीने मास्क वापरत असतात. मास्क न घालणे म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःला तर धोका आहेच परंतु त्यामुळे इतर व्यक्तींनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या व्यक्ती पासून दूर राहा. काही वेळा मास्क लावायला सांगितल्यामुळे काही लोकांनी वाद केल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत.
मास्क घालणाऱ्या व्यक्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शिंक आली तर ते मास्क मध्येच शिंकत नाही तर तो मास्क मस्त पैकी खाली करतात आणि मारून देतात जोरदार फवारा, आणि पुन्हा मास्क आहे तसे नाकावर लावून पुढे निघून जातात. त्यांनी केल्याला या कृत्याचे त्यांना काही वाटत नाही. मास्क खराब होऊ नये म्हणून काळजी घेणाऱ्यांचं कौतुक वाटते, मग शिंकण्यासाठी किमान खिशातील रुमाल काढून नाकावर लावायचा तरी. मास्क चा फायदा काय ? असा भोळाभाबडा प्रश्न आजही अनेकांना पडत आहे. वैद्यकीय तज्ञ असेही सांगतात कि,तोंडातून किंवा नाकातून पडणाऱ्या द्रवाचे आकारमान किती आहे यावर अनेक गोष्टी ठरत असतात. द्रवाचा आकार मोठा असेल तर खाली जमिनीवर पडेल आणि लहान असेल तर थोड्या फार प्रमाणात प्रवास करून हवेत तरंगून पडेल. तो किती काळ प्रवास करेल हे कुणी सांगू शकेलेलं नाही.
यावर अधिक भाष्य करताना यापूर्वीच मुंबईच्या परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ समीर गर्दे यांनी सांगितले आहे कि," जिवाणू आणि विषाणू हवेतून तर प्रवास करून इतरांना बाधित करतात पूर्वापार लोकांना ही माहिती आहे, म्हणून तर आपल्याकडे खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल ठेवा असे लहानपणापासून सांगण्यात येते. लोकं काही तुमच्या तोंडावर येऊन शिंकत किंवा खोकत नाही, काही अपवाद आहेच यामध्ये पण त्यामुळेच आपण कुणी खोकले-शिंकले की सावधान होतो, आणि काहीवेळाआपला रुमाल आपण तोंडावर लावतो. नाका-तोंडातून पडणारे द्रव जड असतील तर ते खाली पडतात आणि मग त्या पृष्ठभागाला हात लागला आणि तोच पुन्हा आपल्या चेहऱ्याला लागला की आपण बाधित होतो आणि द्रव हलके असतील तर काही वेळ हवेत तरंगतील, थोडा हवेत प्रवास करून काही वेळाने पडतील.
सर्वसामान्यपणे कापडी मास्क आणि सर्जिकल मास्क असे दोन प्रकार आणि सध्याच्या काळात प्रचलित आहे. काहीजण एन-95 मास्क लावतात, खरं तर याची गरज आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना अधिक आहे. मात्र ते सर्वसामान्यांनी वापरले तर काही फारसा फरक पडत नाही. मात्र मास्क वापरताना सर्वसामन्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या तर बाजारात फॅशनेबल मास्क मिळत आहे, काही जण आवडीने ते वापरत आहे. कापडी मास्क घालत असाल तर तो व्यवस्थित रोज धुतला पहिजे, रियुजेबल मास्क सध्या बाजारात उपलब्ध आहे जे धुऊन पुन्हा वापरता येऊ शकतात. मात्र सर्जिकल मास्क त्याच दिवशी वापरून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. तो असाच उघड्यवर टाकू नये त्यामुळे आणखी रोगराई पसरू शकते. एखादा वापरलेला मास्क पिशवीत बंद करून तो केराच्या टोपलीतच टाकावा, तो इतरत्र फेकू नये. काही जण एकच मास्क अनेक दिवस वापरत असतात त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन त्या मास्कमुळे अन्य आजार जडू शकतात. त्यामुळे शक्यतो मास्क वापरतानाची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या प्रशासनाने संपूर्ण राज्यात मास्क न घालणाऱ्या विरोधात मोहीम सुरु केली आहे. स्थानिक पातळीवर नगरपालिका, महापालिका, पोलीस प्रशासन सध्या न मास्क घालणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत आहे. खरं तर मास्क घातल्यामुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहणार आहे, पण आपल्याकडे प्रघात झाला आहे. एखादी गोष्ट जनतेच्या हिताची असली तरी ती सर्वानी वापरावी यासाठी नियम केले जातात, कारवाई करण्याची वेळ येते. काही वर्षांपूर्वी बाईक चालविताना हेल्मेट वापरा हे सांगण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली होती. त्यामुळे बऱ्यापैकी लोकांमध्ये जनजगृती आली आहे. काही टगे अजूनही तसेच उंडरत असतात आणि पोलीस कारवाईला सामोरे जात असतात. मास्कच्या बाबतीत असे घडणार नाही अशी अपेक्षा आहे, मात्र मास्कचे महत्त्व आता सगळ्यांना मान्य करून त्याचा वापर करण्यास सुरुवात केलीच पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही अशीच वेळ सध्या नागरिकांवर आली आहे. सध्या ज्या पद्धतीने या कोरोनाविरोधातील लस विकसित करण्याबाबतचे अपडेट येत आहेत, त्यावरून लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी आणखी काही महिन्याचा काळ जाणार हे निश्श्चित झाले आहे. त्यामुळे या आजरापासून दूर राहण्यासाठी मास्क वापरणे हिताचे असल्याचे जागतिक आरोग्य परिषदेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी यापूर्वीच सांगितले आहे. या आजाराने बाधित होणाऱ्या रुग्णाची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. जर हे थांबवायचं असेल तर नागरिकांनी आरोग्य साक्षर होणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे आढळ्यास डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे, वेळेवर औषधोपचार केले तर कोरोना बरा होतो हे सगळ्यांनीच पहिले आहे. मात्र कोरोना आजार होऊनच द्यायचा नसेल तर अशा वेळी मास्क वापरण्यासारख्या महत्तवपूर्ण गोष्टीला टाळून चालणार नाही. बदलत्या जीवनशैलीनुसार मास्क आता जगण्याचा अविभाज्य घटक बनला आहे. तो प्रत्येकानेच वापरला पाहिजे, कारण कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग- BLOG | प्राणवायूची पुण्या-नाशिकात दमछाक!
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे