Babasaheb Ambedkar Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलमधील स्मारक कधी पूर्ण होणार? देवेंद्र फडणवीसांनी डेडलाईन सांगितली, म्हणाले...
Babasaheb Ambedkar Indu mill smarak: बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक कधी पूर्ण होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis on Babasaheb Ambedkar Indu mill memorial: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीत पार पडले तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Babasaheb Ambedkar) स्मारकाचे आपण लोकार्पण करु, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचे नियोजन आहे. यानंतर पुतळ्याच्या उभारणीत अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. सध्या स्मारकाचे 50% काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या अंतर्गत सजावटीची कामे प्रगतीपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू आहेत. त्यामुळे वर्षभरात हे दिमाखदार स्मारक खुले होणार आहे.
पुतळ्याच्या पॅनेल कास्टिंगचे काम सध्या पूर्ण झाले आहे. शंभर फूट उंचीच्या स्मारक इमारतीच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर 350 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूचे आवरण असलेला पुतळा उभारला जाणार आहे. पुतळ्याच्या पायथ्याचे काम सुरू आहे तर पुतळ्याच्या आर्मेचर फॅब्रिकेशनचे काम सुरू असून, सहा हजार टन पोलाद लागणार आहे. त्यापैकी 1400 टन पोलाद आले असून, 650 टनांचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले आहे. कांस्य धातूच्या आवरणाचे कामही सुरु असून पुतळ्याच्या दोन्ही बुटांच्या पॅनेल कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरील शिलाई, लेस हुबेहूब दिसत आहे.
Devendra Fadnavis: बाबासाहेबांनी विषमतेला शक्ती बनवून ज्ञान संपादन केले: देवेंद्र फडणवीस
आपल्या देशात समाजात एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती. मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. या विषमतेला आपली शक्ती बनवून बाबासाहेबांनी ज्ञान संपादन केले आणि समाज जागृत केला आणि संविधान दिले. जात धर्म बाजूला ठेवून संविधान दिले आणि देश यामुळे प्रगती करू शकला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. बाबासाहेबांची वैचारिक दृष्टी मोठी होती. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये आजही वीजेची कमतरता भासते. कारण त्यांच्याकडे स्टेट ग्रीड आहे, नॅशनल ग्रीड नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे वीजमंत्री म्हणून कारभार स्वीकारला तेव्हा एक राष्ट्रीय ग्रीड तयार करण्यात आले. त्यामुळे भारतातील कुठल्याही एका भागातून दुसऱ्या भागात वीज वाहून नेता येणे शक्य झाले. ही गोष्ट त्यावेळी अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या लक्षात आली नाही पण बाबासाहेबांच्या लक्षात आली होती. पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात कोणत्याही ग्रंथापेक्षा संविधान सर्वोत्तम आहे. भारताचे संविधान हे जगातले सर्वोत्तम संविधान आहे. भारताचे संविधान हे जगातले सर्वोत्तम संविधान आहे. प्रत्येक उत्तर या संविधानात सापडते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.





















