कोरोना आणि लॉकडाऊन! मागच्या पंधरा दिवसात सध्या देशात मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात असलेले विषय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली. तर, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. तसं पाहिलं तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना आणि लॉकडाऊन गांभीर्यानं घेतले गेले असल्याचे चित्र आहे. सरकारनं केलेल्या उपाययोजना आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा ग्रामीण भागात तरी चांगलाच आहे. शहरी भागाच्या समस्या, वातावरण आणि परिस्थिती वेगळी असल्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांना दुसरा काही पर्यायही नसेल कदाचित? असो. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि अनेक गावांनी, वाड्या-वस्त्यांनी आपल्या सीमा देखील बंद (सील) केल्या. काहींनी तर चक्क दगड, माती आणि झाडे गावच्या सीमेवर आडवी केली. उद्देश एकच की, लॉकडाऊनची अंमलबजावणी ही कठोरपणे झाली पाहिजे. कोरोनाच्या विळख्यात आपला गाव, वाडी-वस्ती सापडता कामा नये. काही गावांनी तर तसे ठराव ग्रामपंचायतीमध्ये करत गावच्या वेशीवर नागरिकांनी पाळत देण्याचे ठरले. त्याप्रमाणे कामाला सुरूवात झाली देखील. पण, या साऱ्यामध्ये गावच्या वेशीवर दगड, माती आणि झाडे आडवी टाकणे हे कितपत योग्य? यातून आपण कोरोनाचा धसका तर घेतला नाही ना? असे काही प्रश्न समोर येतात त्याला कारणं देखील तशीच आहेत.
लॉकडाऊनचा कालावधी हा 21 दिवसांचा! तसा पाहिला तर हा काळ मोठा. अनेक गोष्टींवर याचा परिणाम जाणवणारा. गावच्या सीमा एकमेकांना लागून असल्यानं व्यवहार देखील तशाच प्रकारे चालणारा. अनेकवेळा अमुक एक वस्ती कोणत्या गावात मोडते? गावाचा जिल्हा आणि तालुका नेमका कोणता? यावर देखील गोधळ उडतो. पण, लॉकडाऊन आलं आणि सारं चित्र बदलले. गावात तर त्यांची अगदी उत्तमपणे अंमलबजावणी सुरू आहे. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता सर्व काही बंद! पण, गावच्या बंद झालेल्या सीमा या मात्र चिंतेचा विषय. शिवाय, लॉकडाऊन वाढल्यास या सीमा अशारितीने केव्हापर्यंत बंद ठेवणार किंवा राहणार हा मुद्दा देखील आलाच.
गावच्या सीमा दगड, माती टाकून बंद करणं कितपत योग्य?
विशेषता कोकणापुरते बोलायचे झाले तर, हा प्रश्न निर्माण होतोच. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा आणि त्याठिकाणी असलेल्या गावच्या सीमा म्हणजे काहीसा गोंधळात टाकणारा असाच विषय. कारण अगदी नेहमी वावरणाऱ्या लोकांना देखील कदाचित अमुक एक गाव नेमकं कोणत्या जिल्ह्यात? हा प्रश्न बुचकाळ्यात टाकणारा असाच. पण, लॉकडाऊननंतर सारं चित्र बदललं आहे. कोकणातल्या अनेक गावांमध्ये सध्या दगड, माती आणि झाडे आडवी टाकून सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोजच्या वावरावर काहीशी बंधनं आली आहेत. आता तुम्ही म्हणाल रोज बाहेर पडायची काय गरज? तसं तुमचे म्हणणे काही चुकीचं नाही. पण, भाजीपाला, दूध, किराणा माल याकरता तरी बाहेर जाणं आलेच. गिऱ्हाईकाला नाही तर किमान दुकानदाराला तर जावेच लागणार. पण, गावाच्या बंद केलेल्या सीमा या मात्र सध्या चिंतेचा विषय ठरत आहेत. रस्त्यांवर माती, दगड आणि झाडे आडवी केल्यामुळे अगदी निकड असल्यास करणार काय? एखाद्याची तब्येत बिघडल्यास, कुणी गरोदर महिला असल्यास अशा घाईच्या आणि गरजेच्या वेळी करायचं काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतो. कारण, बाईक किंवा अगदी सायकलवरून देखील जाताना या ठिकाणी कसरत करावी लागते. त्याठिकाणी कारचा विषय हा लांबचाच. गावच्या सीमा या अशा रितीने आडवल्यामुळे गरजेच्या वेळी करणार तरी काय? जिल्हा किंवा गावचा विचार करता दुसऱ्या जिल्ह्यातील बाजारपेठ किंवा दवाखाने अनेकांना जवळ पडतात. तशा सुविधा देखील त्या ठिकाणी असल्यानं अनेकांची गर्दी दिसून येते. पण, अशा रितीनं अडवलेल्या सीमा हा तसं पाहता चिंतेचा विषय. सध्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस, प्रशासन लक्ष ठेवून आहे. लोकांची तपासणी, विचारपूस केल्यानंतर त्यांना सोडले जात आहे. पोलिसांकडून पास देखील दिले जात आहेत. अशा या साऱ्या स्थितीत जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी घेतलेली काळजी, खबरदारी स्वागतार्ह आणि स्तुत्य अशीच. पण, दगड. माती आणि झाडे पाडून गावची सीमा बंद करणे कितपत योग्य? याचा विचार होणे गरजेचे नाही का? अशीच एखादी तातडी आपल्यापैकी कुणावर आल्यास दगड, माती आणि झाडे दूर करायला किती वेळ लागणार? याचा अंदाज बांधला तर कदाचित स्थितीचं गांभीर्य लक्षात देखील येईल.
रोगापेक्षा इलाज भयंकर
कोरोनाला संपवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सरकारने आखून दिलेले नियमांचे पालन देखील केले पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून गावची, वाडीची, वस्तीची आणि शहराची काळजी देखील घेतली पाहिजे. त्याकरता जनजागृती देखील केली पाहिजे. पण, दगड, माती टाकून गावच्या सीमा अडवणे हा उपाय होऊ शकतो का? या साऱ्या स्थितीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर काळजी घेणे गरजेचे की आपण धसका घेतला आहे? याचा विचार होणे देखील गरजेचे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये आज कोकणातील 80 टक्के लोकं पोटापाण्यासाठी स्थलांतर किंवा अगदी काही जण स्थायिक देखील झाले आहेत. या शहरांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस काळजी वाढवणारी अशी आहे. या ठिकाणी असलेली दाटीवाटीची वस्ती कोकणी माणसाशिवाय कदाचित इतर कुणालाही चांगली माहित नसावी. हातावर पोट असणारे तर लाखो जण या शहरांमध्ये आहेत. पण, सध्याची स्थिती पाहता आता चालत, रेल्वे ट्रॅकचा आसरा घेत किंवा अगदी पोलिसांना चकवा देत ही मंडळी 400 ते 500 किमी पायपीट करत गाव जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे परिस्थिती नेमकी कशी आहे? याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. अशी परिस्थिती असताना गावातील वातावरण आणि परिस्थिती मात्र नक्कीच चांगली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या गावात, वाडी-वस्तीमध्ये होऊ नये यासाठी खबरदारी ही घेतलीच पाहिजे. पण, गरजेच्या आणि निकडीच्या वेळी अशा प्रकारे गावच्या वेशी बंद केल्यास काय परिस्थिती निर्माण होईल? याचा किमान एकदा विचार होणे गरजेचे नाही. अन्यथा एखाद वेळी रोगापेक्षा इलाज भयंकर अशी स्थिती निर्माण झाली नाही म्हणजे आपण मिळवले.