Narendra Modi : नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? संजय राऊतांनी प्रश्नही विचारला अन् उत्तरही दिलं
Sanjay Raut : वडील हयात असताना वारसदार म्हणून मुलाची चर्चा करणं ही मुघली परंपरा आहे, ही आपली परंपरा नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण? मोदींचा वारसदार नेमका कोणत्या राज्यातून असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार कोण ठरवणार? हे प्रश्न पडलेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना. महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रश्नांची उत्तरंही राऊतांकडे आहेत. मोदींच्या वारसदाराबद्दल संजय राऊत काय म्हणत आहेत हे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
ठाकरेंचे खासदार संजय राऊतांना थेट मोदींच्या वारसदारांवर प्रश्न पडला आहे. त्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा आणि त्यातही संघ मुख्यालयाची भेट. मोदींचं संघ मुख्यालयात येणं, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत असणं आणि संघाच्या कार्याचं मोदींनी केलेलं कौतुक. या सगळ्या घटनाक्रमाचा संजय राऊतांनी त्यांना हवा तसाच अर्थ काढला आहे.
मोदींचा वारस, फडणवीसांकडे अंगुलीनिर्देश
मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून असेल असं आज सकाळी संजय राऊत म्हणाले. त्यामुळे राऊतांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे होता का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली. संघाची चर्चा बंद दाराआड असते. ती बाहेर येत नसते. तरीही काही संकेत असतात ते स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता, तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
यावर जेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी संपूर्ण चर्चेला पूर्णविराम दिला. 2029 साली नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. वडील हयात असताना वारसदार म्हणून मुलाची चर्चा करणं ही मुघली परंपरा आहे, ही आपली परंपरा नाही अशा शब्दांत फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.
महायुतीने फटकारलं
फक्त फडणवीसांनीच नाही तर भाजप आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही संजय राऊतांच्या भविष्यवाणीवर चांगलंच तोंडसुख घेतलं. दरेकर आणि शिरसाट यांनी तर ठाकरेंना मिळालेल्या वारशाचीही आठवण करुन दिली. मोदींच्या वारसदाराबाबत संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावरुन महायुतीच्या नेत्यांनी निशाणा साधला. राऊतांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं असा टोला प्रवीण दरेकर आणि शंभूराज देसाईंनी लगावला.
भाजप विरोधकांकडून यावर फारशा प्रतिक्रिया आल्या नाहीत. नाही म्हणायला माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपलं नवं भाकीत करुन टाकलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही नेहेमीप्रमाणेच अतिशय सावध प्रतिक्रिया आली आहे.
मोदींचा वारसदार म्हणून अमित शाह, योगी आदित्यनाथ यांची नावं सतत चर्चेत असतात. त्या यादीत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव सामील केलं आहे. आता हा इशारा करुन संजय राऊत यांनी फडणवीसांचं काम सोपं केलं की अडचण वाढवली हे कळायला काही काळ जावा लागेल.
ही बातमी वाचा:























