Bhiwandi : योग्य दर न मिळाल्याने भेंडी रस्त्यावर फेकून आंदोलन; व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
Bhiwandi News : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी भेंडी, वांगी, मिर्ची ,भसाळी, शिरोळा, दुधी,काकडी अश्या अन्य प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात.
Bhiwandi News : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी भेंडी, वांगी, मिर्ची ,भसाळी, शिरोळा, दुधी,काकडी अश्या अन्य प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. परंतु व्यापाऱ्यांच्या मनमानी भावामुळे भाजीपाल्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी भेंडीला भाव परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. कृषी बाजार समिती तसेच प्रशासन जर शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून अक्षरशः कवडीमोल दरात भाजीपाल्याचे खरेदी होत असल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अक्षरशः लूट केली जात आहे. काबाड कष्ट करून शेतकरी आपल्या शेतात दुय्यम धंदा म्हणून भाजीपाला पिकवत असतो, परंतु मार्केटमध्ये सुरू असलेली सट्टा बाजरीचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच बसतो त्यामुळे या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना आपले पीक देण्यास मनाई केली. त्यांनी व्यापाऱ्यांवर आरोप लावत कृषी बाजार समिती तसेच प्रशासनाला विनंती केली आहे, की त्यांनी योग्य दर भाजीपाल्याला द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही. जर शेतकऱ्यांना शेती पिकवणे परवडतच नसेल तर त्यांच्यापुढे आत्महत्या शिवाय कोणताही पर्याय उरत नसल्याचे खंत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
महागाईच्या काळात शेती करणे परवडत नसून देखील काही शेतकरी आपली शेती चांगल्या पद्धतीने पिकवत आहे परंतु व्यापाऱ्यांकडून मनमानी भाव लावल्याने शेतीसाठी लागलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी निराश झाला आहे. खरंतर काल भेंडीला 32 रुपयाचा भाव मिळाला होता आणि आज याच भेंडीला दहा ते बारा रुपयांचा भाव व्यापाऱ्यांकडून लावल्याने शेतकऱ्यांना भक्कम तोटा होणार होता त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपली भेंडी व भाजीपाला जनावरांना टाकू त्यात आम्ही समाधानी आहोत परंतु व्यापाऱ्यांना एवढ्या स्वस्त दरात भाजीपाला देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली व शेतकऱ्यांनी भेंडी सह अन्य भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त केला असुन प्रसानाने किमान शेतकऱ्यांना भाजीपाल्याला योग्य दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आणखी वाचा :