Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर: नागपूरच्या बहुचर्चित ऑडी कार अपघात प्रकरणी (Nagpur Hit & Run Case) वाहन चालवणाऱ्या अर्जुन हावरे तसेच सोबत बसलेल्या रोनित चिंतमवार (Ronit Chintamvar) या दोघांचा मध्यपान केल्या संदर्भातला फॉरेन्सिक रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे.खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अर्जुन हावरे (Arjun Haware) याच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 100 मिलिलिटर रक्तात अल्कोहोलचे प्रमाण 28 मिलिग्रॅम इतके नोंदवण्यात आले आहे. तर रोनित चिंतमवार याच्या रक्तात मद्याचे प्रमाण 25 मिलिग्रॅम इतके आढळून आले आहे.
नियमाप्रमाणे फॉरेन्सिक चाचणीत 100 मिलिलीटर अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्रॅम असेल तर ती व्यक्ती दारूच्या अंमलाखाली प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. दरम्यान या प्रकरणी दोघांची वैद्यकीय चाचणी अपघातानंतर तब्बल सात तासांनी झाल्यामुळे रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती अचूक आहे, या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. आता दोघांच्या रक्तामध्ये अल्कोहोलचे प्रमाण फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ही सिद्ध झाल्यानंतर पोलीस याप्रकरणी पुढे काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल. तसेच वाहन चालवणारा अर्जुन हावरे हा दारुच्या अमलाखाली होता हे पोलीस मान्य करतात का, हेदेखील बघावे लागेल.