Devendra Fadnavis PC : Sardar Shah Wali Khan कोण आहे? देवेंद्र फडणवीस सांगतात... ABP Majha
Devendra Fadnavis Press Conference : देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर बोलताना दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. आज देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर थेट निशणा साधला आहे. आज बोलताना फडणवीसांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. याबाबत बोलताना फडणवीसांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या दोन निकटवर्तींयाचाही उल्लेख केला. एक म्हणजे, सरदार शाह वली खान आणि दुसरा दाऊदची बहिण हसीना पारकरचा चालक मोहम्मद सलीम पटेलचा. यातील सरदार शाह वली खान म्हणजे, 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार. जाणून घेऊया नेमका कोण आहे सरदार शाह वली खान.
देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार, "सरदार शाह वली खान. हा 1993 बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे आणि सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हा फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिका, या दोन्ही ठिकाणी बॉम्ब कुठे ठेवायचा याची रेकी त्यानं केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे जे कारस्थान शिजलं, त्या बैठकांनाही सरदार शाह वली खान उपस्थित होता. तसेच टायगर मेमनच्या घरातील गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं होतं, त्यामध्येही शाह वली खान सहभागी होता. माहिमच्या अल हुसैनी बिल्डिंगमध्ये टायगर मेमनच्या घरी आरडीएक्स भरण्यातही त्याचा सहभाग होता. माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला होता. त्यामुळे त्याला जन्मठेप झाली आहे. सध्या तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे."