Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
Bhandara Fake Kidnapping : भंडाऱ्याच्या पवनीत 12 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. तीन तासांच्या शोधानंतर पोलिसांनी मुलाला सुरक्षित शोधून काढले.

भंडारा : जिल्ह्यातील पवनी शहरात पाचवीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे तब्बल तीन तास पालकांसह पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. शाळेत केलेल्या खोडसाळपणामुळे शिक्षक आणि पालकांकडून शिक्षा होण्याच्या भीतीने या विद्यार्थ्याने चाकूचा धाक दाखवून अपहरण झाल्याची खोटी माहिती दिली होती. अखेर पोलिसांनी तपास करून हा प्रकार उघडकीस आणला.
शाळेतील खोडसाळपणामुळे घाबरला विद्यार्थी
पवनीतील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने शाळेत काही खोडसाळपणा केला होता. त्यानंतर शाळा प्रशासनाने त्याला आई-वडिलांना शाळेत बोलावून आणण्यास सांगितले होते. मात्र पालकांना शाळेत नेल्यास शिक्षा होईल या भीतीने विद्यार्थ्याने घरातून निघाल्यानंतर वेगळाच प्लॅन आखला.
लिफ्ट घेऊन बसस्टॉपपर्यंत प्रवास
मुलाने एका स्थानिक नेत्याच्या गाडीवर लिफ्ट घेत बसस्टॉपपर्यंत प्रवास केला. त्यानंतर त्याने पुढे प्रवास करत पालकांना फोन करून चाकूचा धाक दाखवून आपले अपहरण झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पालक घाबरून गेले आणि तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
तीन तासांच्या शोधानंतर पोलिसांना यश
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम आणि पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी तातडीने तपास सुरू केला. शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. अखेर तीन तासांच्या शोधानंतर मुलगा सुरक्षित अवस्थेत सापडला आणि अपहरणाचा संपूर्ण बनाव उघड झाला.
अभ्यासाचा ताण आणि शिक्षेची भीती चर्चेत
या घटनेमुळे पालक आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, मुलांवर असलेला अभ्यासाचा ताण आणि शिक्षेची भीती त्यांच्या मानसिकतेवर किती परिणाम करू शकते, हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
ही बातमी वाचा:






















