लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
स्वीकृत नगरसेवक पदासाठी काल प्रदेश पातळीवरून एका नावाची घोषणा पत्राद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली होती.

लातूर : राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर (Latur) महापालिकेत अखेर काँग्रेसने स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन केले. तर, भाजपला विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावावी लागणार आहे. मात्र, भाजपने (BJP) 22 जागा जिंकल्याने दोन स्वीकृत सदस्य भाजपला मिळणार आहेत. त्यानुसार, स्वीकृत नगरसेवकपदाची निवड करण्यात आली. पण, महापालिका निवडणुकीपासून सुरू असलेले भाजपमधील नाराजी नाट्य अद्यापही थांबताना दिसत नाही. लातूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून भाजपमध्ये मोठा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं. त्याच पार्श्वभूमीवर एका पदाधिकाऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं लातूरच्या राजकीय वर्तुळात आणि भाजपमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी काल प्रदेश पातळीवरून एका नावाची घोषणा पत्राद्वारे सोशल मीडियावर करण्यात आली होती. मात्र, आज अचानक ते नाव रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे लातूरमधील पदाधिकारी संजय गिर यांनी दुपारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. नगरसेवक पदासाठी अगोदर नाव झळकले, पण पुन्हा नाव वगळल्याची माहिती मिळताच त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना संजय गिर म्हणाले की, “गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. काल स्वीकृत नगरसेवक पदासाठी माझे नाव सोशल मीडियावर जाहीर देखील झाले. मात्र, आज अचानक ते नाव वगळण्यात आले. त्यामुळे माझी तीव्र नाराजी आहे,” असे गिर यांनी म्हटले. दरम्यान, या घटनेमुळे लातूर भाजपमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली असून, पक्षातील स्थानिक पातळीवरील असंतोष वाढत चालला असून जिल्ह्याचे नेतृत्व करणारे भाजप नेत्यांचा कार्यकर्त्यांवरचा कंट्रोल सुटल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच, भाजपच्या निष्ठावंतांना पक्षात किंमत उरली की नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
लातूरमध्ये भाजपला 22 जागा
दरम्यान, लातूरमधील 70 जागांपैकी काँग्रेस पक्षाने 43 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर यश मिळवले असून, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून एकूण 47 जागा त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे महापालिकेवर काँग्रेस-वंचित आघाडीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. येथील महापालिकेत भारतीय जनता पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) केवळ एकाच जागेवर विजयी ठरला आहे.
हेही वाचा





















