Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Sayali Surve Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील सायली सुर्वेने आंतरधर्मीय विवाहानंतर छळ झाल्याचा आरोप करत पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव अद्या सुर्वे ठेवण्यात आलं आहे.

पुणे : हिंदू धर्मात नुकतीच घरवापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने आपल्या आंतरधर्मीय विवाहाबाबत गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी प्रेमाच्या नात्यात आपल्याला संमोहित करण्यात आलं आणि त्या प्रभावाखाली आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केलं, असं सायली सुर्वेने सांगितलं. तसेच आपला छळ करण्यात आल्याने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतल्याचंही ती म्हणाली. हा प्रकार लव्ह जिहादचाच होता, असा दावाही सायली सुर्वेने केला. तिने एबीपी माझाशी संवाद साधताना आरोप केले.
पिंपरी-चिंचवडमधील रहिवासी आणि 2019 मधील मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सुर्वे हिने आंतरधर्मीय विवाहानंतर झालेल्या कथित छळामुळे पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव बदलून अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले आहे.
प्रेमामध्ये ‘संमोहन’ झाल्याचा दावा
अद्या सुर्वे हिने माध्यमांशी बोलताना सांगितले की, लग्नासाठी तिच्यावर थेट बळजबरी झाली नव्हती, मात्र प्रेमाच्या नात्यात तिला संमोहित करण्यात आले होते. त्या अवस्थेत तिने स्वतःच्या इच्छेने विवाह केला, तरीही हा प्रकार लव्ह जिहादचाच होता, असा दावा तिने केला आहे.
लग्नानंतर छळ आणि मारहाणीचा आरोप
सायली सुर्वेने दहा वर्षांपूर्वी मीरा-भाईंदरमधील उद्योजक आतिफ तासे याच्याशी आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर तिचे नाव बदलून अतेझा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ आणि मारहाण होत असल्याचा आरोप तिने केला आहे. हिंदू रितीरिवाज पाळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जात असल्याचेही तिने सांगितले.
कुटुंबातील परिस्थितीबाबत खुलासा
सायलीने सांगितले की, कुटुंबातील दोन जावांपैकी एक जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत आहे. तर तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होते, मात्र तिच्या नवऱ्याची साथ असल्यामुळे ती परिस्थिती वेगळी असल्याचे तिने नमूद केले.
मुलांसाठी सहन केला अन्याय
सायलीच्या मते, चार मुलांच्या भवितव्यासाठी तिने अनेक वर्षे हा अन्याय सहन केला. मात्र अखेर सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि आपली चूक सुधारण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने चारही मुलांना पुन्हा हिंदू धर्मात परत आणल्याचेही सांगितले.
हिंदू धर्मात प्रवेशाची प्रक्रिया
सायलीला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यासाठी विधीपूर्वक होम-हवन आणि मंत्रोच्चार करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी उपस्थित होते. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव बदलून अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले.
सासरकडून वेगळी प्रतिक्रिया
दरम्यान, सायलीच्या सासू गुलशन पटेल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. सायली आजही माझी सून आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे, सायलीने गेल्या दहा वर्षांत झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली असून आता भीती वाटत नाही आणि मुलांसाठी ठामपणे उभे राहणार असल्याचेही स्पष्ट केले.
ही बातमी वाचा:





















