खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
मला खूप आनंद वाटत आहे, आज आमची संपूर्ण महिला आघाडी इथे आहे, शिवसेनेच्या महिला आघाडीचा हा महिलाभाव आहे.

मुंबई : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी आज आपले खासदारकीचे प्रमाणपत्र घेतले असून शिवसेना खासदार ज्योती वाघमारे (Jyoti waghmare) यांनीही विधानभवनात आपल्या आई-वडिलांसह खासदारकीचे प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, आज खूप आनंद होत आहे राज्यसभेचे अधिकृत खासदार झाल्याचे हे पत्र मिळाल्याबरोबर सर्वात आधी विधान भवनाच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं, सिद्धिविनायक येथे जाऊन आलो आणि समस्त शिवसैनिकांचं (Shivsena) प्रेरणास्थान असलेल्या स्मृतीस्थळावर आले. इथला प्रत्येक मातीचा कण हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पेटलेला आहे, त्या मातीसमोर नतमस्तक होत भीमराज की बेटी आणि बाळासाहेबांची लेक आज खासदार म्हणून दिल्लीला जाते. म्हणून मी बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायला आले आहे, असे ज्योती वाघमारे यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेलाही टोला लगावला, एकनाथ शिंदे हेच विचारांचे वारसदार असल्याचं म्हटलं.
मला खूप आनंद वाटत आहे, आज आमची संपूर्ण महिला आघाडी इथे आहे, शिवसेनेच्या महिला आघाडीचा हा महिलाभाव आहे. महिला एकमेकांच्या साथीने जर उभ्या राहिल्या तर त्या काहीही अशक्य ते शक्य करू शकतात. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे सर्व महिलांना रंणरागिनी म्हणायचे, अशा या रणरागिणी आहेत. आमच्या शिवसेनेच्या प्रत्येक महिला, प्रत्येक नेत्या आज खासदार म्हणून संसदेत जात आहेत, हा आनंद सगळ्यांना झालेला आहे. या सगळ्या बाळासाहेबांच्या पोरी आहेत, बाळासाहेबांच्या पोरींनी जर ठरवलं तर आम्ही हातात बांगड्या नाही तर तलवारी सुद्धा पेलू शकतो अशी ही शिवसेना महिला आघाडी आहे, असे म्हणत ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीचं कौतुक केलंय.
राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचे प्रेरणास्थान डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार मानते. कालच महिला दिन झाला, बाकीच्या नेत्यांनी महिला दिनासाठी गौरवाचे भाषण आणि सत्कार केले. परंतु, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी महिला दिनाची भेट म्हणून एका लाडक्या बहिणीला खासदार करून दिल्लीला पाठवले. खऱ्या अर्थाने ही भेट आम्हाला दिलेली आहे, हीच खरी शिवसेना आहे, खरंतर बाळासाहेब ठाकरे यांचे निर्णय सुद्धा असे धडाकेबाज असायचे, अशी आठवणही ज्योती वाघमारे यांनी शिवाजी पार्कवरुन करुन दिली. बाळासाहेबांनी पान टपरीवाल्याला मंत्री केलं, भाजी विकणाऱ्याला मुंबईचा महापौर केलं. रिक्षावाल्याला शिवसेनेचा नेता, आमदार आणि नंतर मुख्यमंत्री केलं, असेही त्यांनी म्हटले.
ज्योती वाघमारेंचा ठाकरेंना टोला
बाळासाहेबांना सुद्धा आज आनंद होत असेल की, आपली शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हातात सुरक्षित आहे, हा प्रवास सोपा नव्हता. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या रक्ताचे वारसदार आहेत त्यांनी, आजपर्यंत त्यांचा प्रयत्न हा एखाद्या अमराठी महिलेला राज्यसभेवर पाठवण्याचा चालला होता. पण, एकनाथ शिंदे यांनी एका मराठी मुलीला राज्यसभेवर पाठवलं, असे म्हणत नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेवरही टीका केली.
हेही वाचा
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी






















