Vikram Gokhale Death : अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड; सिने कलाकारांकडून भावनिक प्रतिक्रिया
Vikram Gokhale : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनयासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घेतलेल्या सडेतोड भूमिकेमुळे विक्रम गोखले चर्चेत होते. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.






















