Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना. आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख

Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार अगोदरच निश्चित केले असले तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीचा राज्यसभा निवडणुकीतील एकमेव उमेदवार कोण असणार, यापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली होती. अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून फक्त एक खासदार निवडून येण्याइतपत संख्याबळ असतानाही शेवटच्या क्षणी रोहित टिळक आणि ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) या दोघांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election 2026) ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात एक अतिरिक्त उमेदवार उतरवल्याने आता महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार तरी निवडून येणार की नाही, याबाबत काहीशी साशंकता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राज्यसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक ज्येष्ठ नेते इच्छूक होते. त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत शेवटच्या क्षणी डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आदेश दिला. (Maharashtra Politics news)
गेल्या काही काळापासून ज्योती वाघमारे या आक्रमकपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची बाजू मांडत आल्या आहेत. ठाकरे गटाकडून होणाऱ्या प्रत्येक घणाघाती टीकेला ज्योती वाघमारे यांनी तितक्याच धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, तरीही ज्योती वाघमारे या शिवसेनेतील इतर ज्येष्ठ नेत्यांच्या तुलनेत ज्योती वाघमारे नवख्या असल्याने त्यांना राज्यसभेसाठी संधी मिळेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी धक्कातंत्राचा वापर करत ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
Jyoti Waghmare: कोण आहेत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे?
सोलापूरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे. मोची समजातून येणाऱ्या ज्योती वाघमारे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत गरीब कुटुंबाची आहे. शैलीदार निवेदिका, फर्ड्या वक्त्या म्हणून ज्योती वाघमारे या सोलापूरकरांना परिचित आहेत. मातृभाषा तेलगू, इंग्रजी भाषेत पीएचडी, मराठीवर प्रभुत्व असल्याने ज्योती वाघमारे एक प्रभावी वक्ता ठरतात.
गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून काम केले आहे. ज्योती वाघमारे यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. ते एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे, पण चळवळ पाहून लोकांनी त्यांना सोलापूर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
ज्योती वाघमारे यांनीदेखील 2014 साली सोलापूर महिला काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून काम केले होते. पण नंतर त्या राजकारणापासून अलिप्त झाल्या. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश केला. त्यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडली. अनेक जाहीर सभांमधून त्यांनी ठाकरे गटावर तोफ डागण्याचे काम केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख प्रस्थापित केली होती. जून 2022 रोजी शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेत पडलेल्या फुटीत त्यांना संधी मिळाली. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी शिंदे गटात महिला नेतृत्वाची मोठी पोकळी होती. त्यांनी प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्याचे काम केले. त्याचे बक्षीस म्हणून शिंदे गटाकडून त्यांची नियुक्ती शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता म्हणून करण्यात आली. त्यासोबतच त्यांच्याकडे संपर्कप्रमुख धाराशिव जिल्हा ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती.
Maharashtra Politics news: प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी
* इंग्रजी साहित्यात पीएचडी
* दहावीच्या परिक्षेत ज्योती वाघमारे यांना ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.
* बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम
* महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
* १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव
* सोलापुरातल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करणारा चेहरा म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची ओळख आहे.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे वडील श्री. नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी श्री. नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटरचे तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले.
* चळवळीतील कामाचा पोचपावती म्हणून सोलापूरमधील नागरिकांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत श्री. नागनाथ वाघमारे यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.
* प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी काहीकाळ वृत्त निवेदिका म्हणून काम केलं.
* पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली.
* वालचंद महाविद्यालयात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्राध्यापिका म्हणून काही काळ काम केले.
* महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि राज्याच्या राजकारणावरील सखोल अभ्यासपूर्ण भाषण ही प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची वैशिष्ट्ये आहेत.
* सलग तीन दसरा मेळाव्यात घणाघाती भाषणातून ज्योती वाघमारे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.
* जनतेतला धडाकेबाज चेहरा खासदार झाल्यास सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना विस्तारासाठी फायदा होईल.
आणखी वाचा






















