Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Ajit Pawar Baramati Plane Crash : अजितदादांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी अनेक आरोप केले होते. आता पवार कुटुंबीयांकडून त्या आरोपांना दुजोरा दिला जातोय का अशी चर्चा आहे.

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात नव्हे तर घातपातच असल्याचा संशय पवार कुटुंबाला वाटत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. विमान अपघाताप्रकरणी सखोल चौकशी केली जावी आणि व्हीएसआर कंपनीची सर्व विमानं जमिनीवर आणली जावी अशी कुटुंबाची इच्छा असल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्य विमान अपघात प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार करणार असल्याची माहिती आहे. या आधी आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली होती. आता त्यांच्यानंतर दादांच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणी घातपात झाल्याचा संशय असल्याची माहिती आहे.
Rohit Pawar On Ajit Pawar Accident : रोहित पवारांच्या आरोपांना दुजोरा
सध्या व्हीएसआर कंपनीच्या लेअरजेट विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या कंपनीची इतर विमानं अद्याप सुरू आहेत. त्यामुळे या विमान कंपनीवर बंदी घालावी अशी मागणी पवार कुटुंबीय पंतप्रधानांकडे करणार असल्याची माहिती आहे. पार्थ पवार हे लवकरच राज्यसभेवर जाणार आहेत. तर सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत.
या आधी रोहित पवारांनी अजितदादांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली होती. व्हीएसआर कंपनीच्या दुर्लक्षामुळे अजितदादांचा अपघात झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. त्या संदर्भात रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआर कंपनीवर अनेक आरोप केले आहेत.
अपघाताबद्दल पवार कुटुंबीयांनाही शंका
आता अजित पवारांच्या कुटुंबीयांना म्हणजेच, सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि जय पवार यांनाही हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोहित पवारांनी केलेल्या आरोपांना एकप्रकारे हा दुजोरा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे सुनेत्रा पवार या पंतप्रधानांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून एआयआबीच्या अहवालातील त्रुटींवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनीही केली आहे. अजितदादांच्या अपघातामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच लोक अस्वस्थ असून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
ही बातमी वाचा:






















