'हा माझा शेवटचा VIDEO, माझ्या मृत्यूला जबाबदार...', बिग बॉस फेम यूट्यूबर खचला, व्हिडीओतून कुटुंबावर गंभीर आरोप
Bigg Boss 17 Fame Anurag Dobhal: बिग बॉस 17 फेम अनुराग डोभालचा भावनिक व्लॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Anurag Dobhal Emotional video: बिग बॉस 17 फेम अनुराग डोभाल सध्या आपल्या व्लॉगमुळे चर्चेत आहे. त्यानं त्याच्या व्लॉगमधून हा आपला शेवटचा व्हिडिओ असल्याचं म्हटलं आहे. त्यानं आपल्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे, या बाबत माहिती दिली. जर त्याचं काही बरं वाईट झालं तर, त्याला जबाबदार कुटुंबातील सदस्य असतील, असं त्यानं व्हिडिओतून स्पष्ट केलं. त्यानं आपल्या व्हिडिओतून चार लोकांची नावेही उघड केली. अनुराग डोभालचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
व्लॉगच्या सुरुवातीला अनुराग म्हणाला, 'मी माझा शेवटचा व्लॉग असा करेन, असं मला वाटलं नव्हतं. गेल्या काही महिन्यांत इतकं काही घडेल, असंही मला वाटलं नव्हतं. गेल्या 3-4 वर्षांपासून मी खूप गोष्टी सहन करत आहे. गेल्या आठ महिन्यांत सगळ्याच गोष्टी एक्स्ट्रिम झाल्या आहेत, जे मी शब्दांत वर्णन करु शकत नाही', असं अनुरागने स्पष्ट केलं. 'घडलं असं रितिका माझी चाहती होती. ती मला इन्स्टाग्रामवर मेसेज करायची. एके दिवशी मी तिच्या डिएमला रिप्लाय दिला. आम्ही दोन - तीन वर्षे चॅट करत होतो. आम्ही बोलू लागलो. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो'.
'मला रितिका खूप चांगली मुलगी वाटली. म्हणून मी तिच्याशी लग्न करण्याचा विचार केला. मी याची माहिती कुटुंबाला दिली. इंटरकास्ट असल्यामुळे घरच्यांनी आधी विरोध केला. नंतर लग्नासाठी तयार झाले. पण लग्नाच्या अगदी पाच दिवसांपूर्वी माझ्या घरच्यांनी निर्णय घेतला की ते लग्नाला उपस्थितीत राहणार नाही. माझ्या कुटुंबाने मला सगळ्यांसमोर माफी मागायला लावली. तसेच पाय पडायला लावले. आम्ही आनंदी राहणार नाही, आणि तुम्हालाही राहू देणार नाही, असं कुटुंबाने म्हटलं होतं', असं अनुराग म्हणाला.
अनुरागने व्हिडिओतून दावा केला की, त्याने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची पत्नी रितिका देखील त्याला सोडून गेली, अशी माहितीही त्यानं व्हिडिओतून दिली. व्हिडिओ शूट करत असताना तो प्रचंड रडला. 'जर माझ्या जिवाचं बरं वाईट झालं तर, याला आई- वडील, भाऊ कलम आणि श्रेया जबाबदार असतील', असं त्यानं व्हिडिओत सांगितलं. तो प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला आहे. डिप्रेशनमधून नेमकं कसं बाहेर पडावं, त्याला कळत नसल्याचं अनुरागनं व्हिडिओतून सांगितलं.
व्हिडिओमध्ये अनुराग म्हणाला, 'कदाचित मी गायब होईन.. मला फक्त झोपायचं आहे. मी पाच दिवसांपासून काही खाल्लेलं नाही. मी पूर्णपणे वेडा झालो आहे. माझ्या भावाने मालमत्ता तसेच कुत्रा हिसकावून घेतला होता', असं अनुरागने व्हिडिओतून स्पष्ट केलं.





















