Zero Hour : संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य ते धर्मवीर - 2 चा रिव्ह्यू
झीरो अवरमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत.. आता चर्चा करुयात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या डिक्शनरीची... बरं, ही डिक्शनरी अशी आहे.. की त्यातले काही शब्द... आम्हालाही बीप करावे लागतायेत...
आता हेच बघा...
आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीची जेव्हा केव्हा चर्चा केली जाईल.. त्याच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा उल्लेख नक्की होईल.. पत्रकार म्हणून संजय राऊतांनी कारकीर्द सुरु केली.. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.. जो आजही सुरुच आहे.. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये जे संजय राऊत देशानं पाहिलेत.. ते एकदम आक्रमक स्वरुपातच... मविआच्या फॉर्मेशनमध्येही त्यांची भूमिका महत्वाची होती..तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत... आणि अमित शाहांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत... अशा प्रत्येक विरोधी नेत्याला अंगावर घेण्यासाठी सर्वात पुढे असातात ते संजय राऊत..
पण, ते राऊत.. कधी कधी इतके आक्रमक होवून जातात की... त्यांना त्याचा फटकाही बसतो.. आता आजचंच उदाहऱण घ्या.. राजकीय पलटवार करण्याच्या नादात संजय राऊतांनी जी वक्तव्य केली.. त्यावरुन नवा संघर्ष पेटला.. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या डिक्शनरीतून एक एक नवा शब्द बाहेर आला... ज्यानं एक लक्षात आलं... की विरोधकांवर टीका करण्यसाठी राज्यात कोणत्याही शब्दांचा वापर केला जावू शकतो..... ही सगळी डिक्शनरी पाहणार आहोतच.. मात्र, सुरुवात करुयात संजय राऊतांच्या वक्तव्यानं..
आणि आता झीरो अवरमध्ये आजची आणखी एक मोठी गोष्ट. धर्मवीर टू या चित्रपटाची. या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शकाच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हेच चित्रपटाचं धर्मवीर टू चित्रपटाचं उपनाव आणि त्याचा गाभाही आहे. एक पत्रकार या नात्यानं ठाकरे या चित्रपटानंतर धर्मवीर टू चित्रपटाचाही मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. या चित्रपटाच्या उपनावात असलेल्या साहेब या बिरुदावलीत आनंद दिघे आणि त्यांचे राजकीय पट्टशिष्य एकनाथ शिंदेही अभिप्रेत असावेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बंडामागची कारणं आणि त्यांच्या आमदारांच्या त्याआधीच्या अस्वस्थतेमागची कारणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. अर्थात ती नाण्याची एकच बाजू आहे. एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचाही प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यासाठी मविआ सरकारच्या काळातल्या घटना आणि दिघेंच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घालून हा चित्रपट पुढे सरकतो. उद्धव ठाकरे यांनी मविआत सहभागी होताना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी किंवा तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून बंडाच्या समर्थनासाठी करण्यात येतो. तोच अधोरेखित करण्यासाठी आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटनांचा आणि मविआ सरकारच्या काळातल्या घटनांचा वापर करून त्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्याही व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर दिसतात. शिंदे गटाची मविआ सरकारच्या काळातली राजकीय अस्वस्थता ते मांडतात. संपूर्ण चित्रपटात उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची व्यक्तिरेखा दिसत नाही. पण राऊतांचा प्रवक्ते म्हणूवन होणारा उल्लेख आणि उद्धव ठाकरेंचा नाव न घेता प्रसंगाला साजेसा होणारा उल्लेख हा त्यांचं अस्तित्व कथेतलं जाणवून देतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या पडद्यावर न दिसणाऱ्या साहेबांची बाजू सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसते. एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला भावेल का हा प्रश्न आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवल्यानं त्याचा राजकीय परिणाम किती होईल, हीच माझ्यातल्या पत्रकारासाठी उत्सुकता आहे.