IPL 2020 KXIP vs RCB: पंजाबचा बंगलोरवर 97 धावांनी विजय, केएल राहुलची निर्णायक खेळी
केएल राहुलने यंदाच्या मोसमातील पहिलं शतक झळकावलं. टी -20 क्रिकेटमधील हे राहुलचे चौथे आणि आयपीएलमधील दुसरं शतक आहे.
IPL 2020 KXIP vs RCB: किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 97 धावांनी धुव्वा उडवला आहे. पंजाबनं बंगलोरला 207 धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगलोरचा डाव अवघ्या 109 धावांत आटोपला. पंजाकडून मुरगन अश्विन, रवी बिश्नोईने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. किंग्स इलेव्हनचा मोसमातला पहिला विजय साजरा केला. पंजाबच्या विजयात लोकेश राहुलची शतकी खेळी निर्णायक ठरली.
त्याआधी, आयपीएलच्या मैदानात कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाबनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसमोर 207 धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. लोकेश राहुलनं यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक झळकावताना 69 चेंडूत नाबाद 132 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे पंजाबला 20 षटकांत तीन बाद 206 धावांचा डोंगर उभारता आला. राहुलचं हे दुसरं आयपीएल शतक ठरलं. याआधी 2019 च्या आयपीएल मोसमात राहुलनं मुंबईविरुद्ध शतकी खेळी साकारली होती. लोकेश राहुल आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. बंगलोरविरुद्धच्या सामन्यात राहुलनं रिषभ पंतला मागे टाकलं.
वैयक्तिक सर्वोच्च धावा करणारे भारतीय फलंदाज केएल राहुल- 132 धावा रिषभ पंत- 128 धावा मुरली विजय- 127 धावाराहुलच्या अखेरच्या 15 चेंडूत 55 धावा
राहुलने पहिल्या 54 चेंडूत 77 धावा केल्या. त्यानंतर पुढच्या 15 चेंडूंमध्ये राहुल तडाखेबाज खेळी करत 55 धावा काढल्या. राहुल 69 चेंडूत 132 धावा करत नाबाद राहिला. राहुलने आपल्या खेळीत 14 चौकार आणि सात षटकार ठोकले. राहुलच्या या तुफानी डावामुळे पंजाबने शेवटच्या चार षटकांत 74 धावा केल्या.
केएल राहुल सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज
केएल राहुलने सामन्यात दोन धावा काढल्या आणि तो सर्वात वेगवान 2000 धावांचा टप्पा गाठणारा भारतीय फलंदाज ठरला. आयपीएलच्या 60 व्या डावात राहुलने हा विक्रम केला. याआधी आयपीएलमध्ये वेगवान 2,000 धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने 63 डावात हा पराक्रम केला होता. आता राहुलने 60 डावांमध्ये 2 हजार धावा करून सचिनला मागे टाकलं आहे.
ख्रिस गेलच्या नावावर वेगवान 2,000 धावांचा विक्रम
ख्रिस गेलच्या आयपीएलमध्ये सर्वात वेगवान दोन हजार धावांचा विक्रम आहे. गेलने केवळ 48 डावांमध्ये ही कामगिरी केली. या यादीत पंजाबकडून खेळलेला शॉन मार्श दुसर्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजाने 52 डावात हे कामगिरी केली. तर राहुल आयपीएलमध्ये 2,000 हजार धावा करणारा वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे.