एक्स्प्लोर
मोदी एका दगडात दोन पक्षी मारायचे तर पवार चार पक्षी मारतात : विजय वडेट्टीवार
कॉंग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेगवेगळ्या विषयांवर एबीपी माझाशी दिल्लीमध्ये संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार पाच वर्ष सरकार स्थिर राहील याचा दावा केला तसेच भाजपवर आरोप देखील केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दगडात दोन पक्षी मारायचे मात्र शरद पवार हे एका दगडात चार पक्षी मारतात, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. शरद पवार हे एका मुलाखतीत म्हणाले होते पाच वर्ष सरकार स्थिर राहील. त्यामुळे आम्हाला स्थिरतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले. मोदींना त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा होता तर पाच वर्षांपूर्वीच मंत्रिमंडळात का नाही घेतलं?, असा सवाल देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.
वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादी भाजप सोबत जाण्याचा विषय आता संपला आहे. तीन पक्षांचं हे सरकार बनवायला एक महिना लागला. कारण पूर्णतः अभ्यासाअंती हा निर्णय घेतला गेलेला आहे. पक्ष निहाय खाते वाटपाचा विषय वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल. त्यानंतर अधिवेशनाच्या अगोदर विस्ताराचा ही विषय संपावा अशी आमच्या हायकमांडची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितलं.
सिंचन घोटाळ्यावर काय म्हणाले वडेट्टीवार
सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरूच आहे. बच्चू कडू म्हणतात म्हणून ती करायची गरज नाही. ज्यांनी बैलगाडीभरुन पुरावे आणले होते त्यांना काहीच मिळाले नाही. तरी पण कुणाला चौकशी करायची असेल तर होऊन जाऊ द्या. एकदा हा विषय संपला पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
भाजप ओबीसी विरोधी पक्ष
भाजप हा नक्कीच ओबीसी विरोधीपक्ष आहे. बहुजनांना एक केळ द्यायचं आणि सांगायचं दहाजण वाटून खा आणि स्वतः मात्र एक डझन खायचे, अशी त्यांची पद्धत आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, महादेवराव शिवणकर, गुडदे पाटील हे सगळे बहुजन समाजातले नेते आहेत. पण कुणालाही योग्य स्थान भाजपने योग्य दिले नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पक्ष सोडण्याची तयारी केली होती. मात्र निर्णय झाला नाही, असेही वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पंकजा ताईंसोबत कुणी 'गेम' केला हा प्रश्न आहे. मला वाटतं तो गेम करणाऱ्यांवर पंकजाताई आता नेम साधत आहेत. तो नेम अचूक चालला आहे. येत्या 12 तारखेला कळेल, असेही ते म्हणाले.
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीची दिशा भरकटली होती हा आमचा आरोप आहे. मुळे गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत. सरकारनं त्यावेळी निष्पक्ष भूमिका पार पाडली नाही, असे देखील वडेट्टीवार म्हणाले.
सनातनवर बंदी घालण्यासंदर्भात ते म्हणाले की, बंदी कसली घालता यांना तर ठेचून काढले पाहिजे. सनातनच्या नावाखाली लोकांचे मुडदे पाडायचा अधिकार यांना कुणी दिला. अशा लोकांना केवळ बंदी घालून चालणार नाही ही माणसं संपली पाहिजेत यासाठी कायदे केले पाहिजेत, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळ निर्माण झाल्यानंतर या बंदीबाबत सविस्तर चर्चा करू. काँग्रेस यासाठी निश्चित आग्रही असेल, असेही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement