Nagpur : प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात व्यापाऱ्यांची मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा
अधिसूचनेनुसार 1 जुलैपासून संपूर्ण शहरात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. शहरातील व्यापारी बांधवांनी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
नागपूर: केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाद्वारे जारी अधिसूचनेनुसार नागपूर शहरात 1 जुलैपासून नमूद सिंगल यूज प्लास्टिक पूर्णत: बंदी लावली जाणार आहे. प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात शहरातील व्यापारी बांधवांनी बुधवारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेउन चर्चा केली व आपल्या शंका आणि प्रश्न मांडले.
मनपा आयुक्त सभाकक्षात झालेल्या चर्चेदरम्यान मुख्य अभियंता प्रदीप खवले, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नागपूरचे उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, क्षेत्र अधिकारी किशोर पुसदकर यांच्यासह कपडा मार्केट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन आणि अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अधिसूचना जारी केली. त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक साहित्याची निर्मिती, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर यावर 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे प्रतिबंध लावण्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार 1 जुलैपासून संपूर्ण शहरात मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या महत्वाच्या या निर्णयाला साथ देत शहरातील व्यापारी बांधवांनी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
यावेळी प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात असलेल्या शंका आणि प्रश्न व्यापारी बांधवांनी मांडले. मनपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निराकरण करून व्यपारी बांधवांचे समाधान केले. मनपा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे देण्यात आलेले निर्देश आणि सूचनांचे तंतोतत पालन करून प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी यावेळी व्यापारी बांधवांनी दिली.
फुड पॅकिंगसह आदींवर मागवणार खुलासा
व्यापाऱ्यांना फुड पॅकिंग आदींबाबत प्लास्टिकचा वापर करणे आवश्यक असते. मात्र नव्या नियमानुसार यावरही बंदी असणार आहे. त्यामुळे फुड पॉकिंगसाठी लागणारे प्लॅस्टिकसह आदी समस्यांबाबत व्यापाऱ्यांचे निवेदन मंडळाकडे पाठवणार असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. मंडळाकडून आलेला खुलासाही व्यापाऱ्यांना देण्यात येणार आहे.