Karmveer Jagdale Mama : जगदाळे मामांना जयंतीनिमित्त अभिवादन; बार्शीसह परिसरात शिक्षणाची गंगा आणणारे कर्मवीर
Karmaveer Jagdale Mama Jayanti : आज कर्मवीर जगदाळे मामा यांची जयंती. या निमित्तानं बार्शीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कर्मवीर जगदाळे मामा यांचं कार्य खूप मोठं आहे.
Karmaveer Jagdale Mama: तुम्ही बार्शी किंवा सोलापूर, उस्मानाबाद परिसरात गेलात तर एका कर्मवीराचं नाव तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. ते नाव म्हणजे कर्मवीर जगदाळे मामा. त्यांच्या कामानं त्यांना राज्यभर कर्मवीर म्हणून ओळख मिळाली. शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यातल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचावी, त्यांना आत्मभान यावे आणि कर्तृत्वसंपन्न आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडवावी, या उद्देशाने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी अनेक शिक्षणसंस्था स्थापन केल्या.
निवृत्ती गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1903 रोजी झाला होता. मामासाहेब जगदाळे यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील भिकार सारोळे (ता. वाशी) या गावी वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव चारे बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक होते. मामांचा उल्लेख बहुजनांच्या शिक्षणाचे कैवारी म्हणून केला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद या सीमावर्ती भागात बहुजन मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून बार्शी येथे ‘श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ’ स्थापन करून शिक्षणप्रसार केला.
ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने बार्शी येथे जगदाळे मामा हॉस्पिटलची[ स्थापना त्यांनी केली. इथं गरजूंना अल्पदरात वैद्यकीय सेवा दिली जाते. शिक्षण संस्थेमार्फत हे हॉस्पिटल चालवले जाते.
जयंतीनिमित्त बार्शीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त बार्शीमध्ये रॅली काढण्यात आली. या जनजागरण फेरीतून विविध प्रशालेंच्या पथनाट्य आणि चित्ररथांनी सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता, संविधान सन्मान, ग्रामस्वच्छता, रस्ता सुरक्षा जाणीव जागृती, पर्यावरण रक्षण, पाण्याची बचत, आरोग्य जनजागृती, अवयवदान, व्यसनमुक्ती असे सामाजिक संदेश दिले.
जनजागरण फेरीच्या अग्रभागी ट्रॉलीमध्ये कर्मवीर जगदाळे मामांचा पूर्णाकृती पुतळा व त्यानंतर विविध शाळा महाविद्यालयांची पथके सहभागी झाली होती. जिजामाता विद्यामंदिर, शिशु संस्कार केंद्र, महात्मा फुले विदयामंदीर, शिशु संस्कार प्राथमिक विदयामंदीर, जिजामाता कन्या प्रशाला, महाराष्ट्र विदयालय, शंकरराव निंबाळकर अध्यापक विदयालय, कर्मवीर कृषी तंत्र विदयालय, शिक्षणशास्त्र महाविदयालय, शिवाजी महाविदयालय, बी.पी.सुलाखे काॅमर्स कॉलेज, राजर्षी शाहू विधी महाविदयालय, कॉलेज ऑफ नर्सिंग, जगदाळे मामा हॉस्पीटल आणि त्यानंतर जामगांव येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्राचा व्यसनमुक्तीबाबत संदेश देणारा रथ यांचा या जनजागरण मिरवणुकीत सहभाग होता.
जनजागरण फेरीच्या निमीत्ताने विद्यार्थी, विद्यार्थिनींनी फेटे, तसेच पारंपारिक पोशाख अशा पेहरावात लेझीमसह विविध नृत्याचे सादरीकरण केले. सवाद्य निघालेली ही आकर्षक जनजागरण फेरी पाहण्यासाठी शहरवासियांनी गर्दी केली होती. शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने जनजागरण फेरीचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले.