Ratnagiri News : शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचे 'मिशन लोटस'
शिवसेनेच्या बालेकिल्यात आता भाजपचे 'मिशन लोटस'केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तीन दिवसांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरअजयकुमार 7 ऑगस्ट रोजी रत्नागिरीत; मतदारसंघाचा घेणार आढावा
BJP Mission Lotus : भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी (1 ऑगस्ट) रत्नागिरी (Ratnagiri) येथे बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Kumar Mishra) यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा घोषित केला. त्यानंतर आता शिवसेनेच्या (Shiv Sena) बालेकिल्ल्यात भाजपने 'मिशन लोटस' (Mission Lotus) हाती घेतलेले आहे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. 7 ऑगस्टपासून तीन दिवस अजयकुमार मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत विकासात्मक कामांचा आढावा घेणार आहेत.
विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीनंतर राऊत सध्या राज्यव्यापी दौरे करत आहेत. आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने लोकसभा प्रवास योजना आखली आहे. त्यानुसार 16 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रित केलं असून यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती
मागील पंधरा ते वीस दिवसांमध्ये भाजपचे नेते आशिष शेलार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दौरा केलेला आहे. त्यानंतर आता केंद्रीय गृहराज्यमंत्री देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. त्यामुळे एकंदरीत भाजपची रणनीती आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्पष्ट होताना दिसत आहे.
काल भाजप नेत्यांचा रत्नागिरी दौरा
दरम्यान काल एकीकडे आदित्य ठाकरे यांची 'शिव संवाद' यात्रा सिंधुदुर्गमध्ये असताना, शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये भाजपच्या नेत्यांचा दौरा होता. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलेल हा विश्वास काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी भाजपची ताकद देखील नगण्य आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या कालच्या दौऱ्याला स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका पाहता महत्त्व होतं.