त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
बनावट जन्म प्रमाणपत्र दाखलेसंदर्भात मुलुंड कुर्ला तहसीलदार यांची भेट घेत किरीट सोमय्या यांनी आज कार्यालयात ठिय्या मांडला होता.

मुंबई : मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, 2019 ची घटना मी विसरू शकत नाही. पक्षासाठी मी त्याग, बलिदान दिले आहे. आता मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी पक्षासाठी काम करत आहे. मी सर्वांपेक्षा जास्त हजारो पटीने मी काम करत आहे, कार्यकर्ता माझ्यासोबत आहे हे माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे, असे म्हणत आपण नाराज नसल्याचे भाजप (BJP) नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपच्या निवडणूक संचालक पदासाठी अमित साटम का हट्ट करत आहेत हे मला माहिती नाही, असेही सोमय्या यांनी म्हटले. मात्र, आजही त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळी झालेला अवमान ते विसरले नसल्याचं यावेळी दिसून आलं.
बनावट जन्म प्रमाणपत्र दाखलेसंदर्भात मुलुंड कुर्ला तहसीलदार यांची भेट घेत किरीट सोमय्या यांनी आज कार्यालयात ठिय्या मांडला होता. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी 2019 चा अवमान विसरू शकत नसल्याचे पुन्हा एकदा जाहीरपणे सांगितले. मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्यासाठी हा भाजपचा कार्यकर्ता पुढे येत आहे, बांगलादेशी मला बघितलं की घाबरत आहेत, हे माझ्यासाठी मोठं पद आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटलं. मला लोकसभेची उमेदवारी दिली नाही, हा विषय उमेदवारीचा नव्हता. पार्टीने मला त्यापेक्षा खूप उंच बनवलं आहे.
भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी समझोता केला हे ठिकंय, पण मुद्दा असा आहे की, मला प्लॅटफॉर्मवरुन बाहेर काढलं, पार्टीच्या सभागृहातून बाहेर काढलं हे केवळ उद्धव ठाकरेच्या जिद्दमुळे ह्याला मी कधीही त्या भाजप नेत्याला माफ करू शकत नाही, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. दरम्यान, नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. पण, मुख्यमंत्री माझी काळजी घेत असतात, देशाच्या गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली आहे, यापेक्षा महत्वाचं काय आहे, असेही सोमय्यांनी म्हटले.
2019 ला नेमकं काय घडलं?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यासोबत पत्रकार परिषद होणार होती. या पत्रकार परिषदेतून किरीट सोमय्यांना अपमानित होऊन बाहेर जावं लागलं होतं. जोपर्यंत किरीट सोमय्या तिथे आहेत, तोपर्यंत मी पत्रकार परिषदेला येणार नाही, असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी घेतला होता. सरशेवटी भाजप नेत्यांनी किरीट सोमय्या यांची समजूत काढली आणि त्यांना हॉटेलमधून जाण्यास सांगितले होते.
हेही वाचा
उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
























