बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही.

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री, आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी स्वतंत्र विदर्भ (Vidarbha) हा भारतीय जनता पक्षासाठी कायमच प्राधान्याचा विषय आहे, अशा आशयाचं विधान केलं आहे. एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भावर परखडपणे भाष्य केलं. त्यावरुन, आता वेगळ्या विदर्भाची चर्चा सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राचे तुकडे करायला तो काय केक वाटला का, असे म्हणत वेगळ्या विदर्भाच्याविरुद्ध राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भूमिका मांडली होती. आता, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरेंचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. तर, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी आता काढत आहे, मात्र हा मुद्दा आमचा आहे. भाजपच्या अजेंडाचा मुद्दा आहे. भाजपच्या अजेंडातून हा मुद्दा बाहेर गेलेला नाही, आम्ही त्यावर पहिल्यापासूनच काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आतापर्यंत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. भाजपची भूमिका वेगळ्या विदर्भाच्या बाजूची असल्याचे बावनकुळे यांनी माझा व्हिजन कार्यक्रमातून म्हटले होते. त्यामुळे, पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची चर्चा जोर धरत आहे. तसेच, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. त्यातच, सोशल मीडियावर राज ठाकरेंचा जुना 2016 च्या भाषणातील व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसून येतं.
जुन्या व्हिडिओत राज ठाकरेंनी काय म्हटलं.
राज ठाकरे यांनी 2016 मध्ये मनसेच्या दसरा मेळाव्यातून वेगळ्या विदर्भावर परखडपणे भूमिका मांडली होती. शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये राज ठाकरेंनी अखंड महाराष्ट्राचा सूर आळवला. विदर्भ स्वतंत्र करा, मराठवाडा स्वतंत्र करा म्हणणाऱ्यांवर ठाकरे शैलीत फटकेबाजी केली होती. तुकडे करायला महाराष्ट्र केक आहे का ? कोणीही यावं आणि बकाबका खावं असं म्हणत राज ठाकरेंनी तेव्हाच्या वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरुन भाजप, आरएसएस आणि श्रीहरी अणेंना लक्ष्य केलं होतं. राज्याचे तुकडे करायचे असतील तर संघानं गुजरात तोडावा, झेपत नसेल तर खूर्ची खाली करा, पण महाराष्ट्र तोडून देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल#rajthackeray #bjp #vidarbha pic.twitter.com/mZcYgzA3A0
— ABP माझा (@abpmajhatv) December 9, 2025
विजय वडेट्टीवार काय म्हणाले
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. वेगळा विदर्भ आम्हाला हवाय कारण आताच्या सामाजिक समीकरणानुसार विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिले आहे. विदर्भात मिश्र समाज आहे. या समाजांच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. जोपर्यंत सत्तेत सहभागी होत नाही, तोपर्यंत त्या भागाला न्याय दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ झाला पाहिजे, ही आमची मागणी असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
























