पापलेट राज्यमासा म्हणून घोषित; 54 माशांचे आकारमान निश्चित, खरेदी- विक्रीवर राज्य सरकारचे निर्बंध
सुरमई असो किंवा बांगडा, सौदळा असो किंवा पापलेट यासह इतरही 54 माशांचं आकारमान निश्चित करण्यात आलं आहे.
रत्नागिरी : पापलेट राज्यमासा (Pomfret Fish) म्हणून घोषित झाला. त्यानंतर आता 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. त्यामुळे याच्या फायद्या - तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत येणाऱ्या अडचणी याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुरमई, पापलेट, बोंबील, सौदाळा, कोळंबी, खेकडा यासारखी एक ना अनेक नावं ऐकल्यानंतर तुमच्यातील मत्स्य खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं नाही का? दरम्यान, बाजारात गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये थाळीची ऑर्डर दिल्यानंतर माशांच्या आकाराकडे प्रत्येकाचं लक्ष असते. अर्थात दर देखील याच आकारमानावरून ठरतात. दरम्यान, याच माशांचं आकारमान निश्चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारनं काही निर्बंध आणले आहेत यामध्ये 54 माशांचा समावेश आहे. त्यामुळे सुरमई असो किंवा बांगडा, सौदळा असो किंवा पापलेट यासह इतरही 54 माशांचं आकारमान निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या आकरामानापेक्षा आकारानं लहान असलेला मासा पकडता येणार नाही. शिवाय, त्याची खरेदी विक्री देखील करता येणार नाही.
54 प्रजातींसाठी आकारमान निश्चित
दरम्यान आकारमान निश्चित केलेल्या माशांमध्ये सुरमई 370 मिमी, बांगडा 140 मिमी, सरंगा 170 मिमी, तारली 100 मिमी, सिल्वर पापलेट 135 मिमी, चायनीज पापलेट 140 मिमी, भारतीय म्हाकूळ 100 मिमी, झिंगा कोळंबी 90 मिमी, मांदेली 115 मिमी, मुंबई बोंबील 180 मिमी यासह इतर प्रजाती मिळून 54 प्रजातींसाठी हे आकारमान अशाप्रकारे निश्चित केलेलं आहे.
माशांचं संवर्धन होणे गरजेचे
सध्या माशांच्या साठ्यात कमतरता येत असलेल्याचं दिसून येत आहे. काही मासे हे लुप्त होण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीनं शासनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. पण, यामध्ये अडचणी देखील आहेत. माशांचं संवर्धन होणे आणि लहान माशांची वाढ होऊन मत्स्यसाठा वाढत जाणे या दृष्टीनं सदरचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यासाठी मच्छिमारांसह खवय्ये आणि आपण सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे असलेल्या अडचणींवर मार्ग काढत प्रत्येकानं जबाबदारीनं वागून नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. निश्चित केलेल्या आकरामानापेक्षा आकारानं लहान असलेला मासा पकडता येणार नाही. शिवाय, त्याची खरेदी विक्री देखील करता येणार नाही.
हे ही वाचा :
Pune News : बॅगमध्ये पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी, गुडलक कॅफेमागे पोलिसांनी गाठलं अन् केली पोलखोल