(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune PMPML News: पुणेकरांनो फक्तPMPML मध्ये प्रवास करू नका; तुमचे अनुभव लिहा आणि जिंका मोफत प्रवास
पीएमपीएमएल आणि त्यातील प्रवासी यांच्यातील घट्ट नाते टिकवून ठेवण्यासाठी पीएमपीएमएलने ‘मी पीएमपीएमएल चा प्रवासी’ ही स्पर्धा आयोजित केली आहे.
Pune PMPML News: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) ही पुणे आणि पिंपरी चिंचवडची सार्वजनिक बससेवा आहे. पीएमपीएमएल आणि त्यातील प्रवासी यांच्यातील घट्ट नाते टिकवून ठेवण्यासाठी पीएमपीएमएलने ‘मी पीएमपीएमएल चा प्रवासी’ ही स्पर्धा आयोजित केली आहे.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट लेख, सर्वोत्कृष्ट कविता, सर्वोत्कृष्ट फोटो आणि सर्वोत्कृष्ट व्हिडिओ अशा श्रेणी असतील. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व ठिकाणांसाठी बस पास आणि या शहरांमध्ये तीन महिन्यांसाठी पीएमपीएमएल बसमधून मोफत प्रवास अशी बक्षिसे विजेत्यांना दिली जातील. ही स्पर्धा ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीनेही असेल.
सहभागी त्यांचे लेख, कविता, फोटो किंवा व्हिडिओ pmpmlcontest@gmail.com या ई-मेल आयडीवर किंवा 9011038149 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवू शकतात. ऑफलाइन सहभागासाठी, सहभागी त्यांच्या हार्ड कॉपी सर्व मुख्य डेपोमध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान जमा करू शकता.
PMPML बस कायम नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर,उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहूत अनेक वारकरी उपस्थित असतात. त्यांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी दरवर्षी पुणे पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय केली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन वर्ष वारी जोमात होऊ शकली नाही मात्र यावर्षी पायी वारी होणार असल्याने यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून जादा बसेसची सोय करण्यात आली होती.
पीएसपीएमएलमुळे सिंहगडावर जाणं सोपं
पुण्याच्या सारसबागेजवळ पीएमपी प्रशासनाअंतर्गत नवा टुरीस्ट डेपो उभारण्यात येणार आहे. सिंहगडावर जाण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातल्या नव्या गाड्या या टुरीस्ट डेपोमधून सुटणार आहे. या डेपोमुळे पुणेकरांचा सारसबाग ते सिंहगड प्रवास सोपा होणार आहे. सिंहगड किल्ल्यावर 1 मेपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु करण्यात आली. या बस वगळता इतर वाहनांना किल्ल्यावर प्रवेश बंद करण्यात आल्या. मात्र शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर गर्दी झाल्याने बस अपुऱ्या पडल्या.