Sharad Mohol : समाजकारणातून राजकारणातील एन्ट्रीची महत्वकांक्षा अन् त्यापूर्वीच दिवसाढवळ्या गेम; कुख्यात गँगस्टर शरद मोहोळचा भयावह शेवट
Sharad Mohol : शरद मोहोळवर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद मोहोळविरूध्द अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका झाली आहे.
पुणे : तलवार गँगचा हैदोस सुरु असतानाच पुण्यनगरी (Pune Crime) पुन्हा एकदा दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने हादरले आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची आज (5 जानेवारी) लग्नाच्या वाढदिनीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कोथरुडमधील सुतादऱ्यात बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी शरद मोहोळवर समोरून गोळ्या झाडल्यानंतर गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे. गोळीबार झाल्याची आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. शरद मोहोळवर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. शरद मोहोळविरूध्द अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही गुन्ह्यात त्याची निर्दोष सुटका झाली आहे.
कोण होता शरद मोहोळ? (who is Sharad Mohol)
ज्या मुळशी पॅटर्न चित्रपटाने पुण्यातील आणि मुळशी खोऱ्यातील गुन्हेगारीची जगताची ओळख झाली, त्याच मुळशी तालुक्यातील शरद मोहोळ होता. गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करत होता. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला. शरदचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही गुन्हेगारीकडे वळला होता.
गेल्यावर्षी तडीपारची कारवाई
गुंड शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. याप्रकरणात तो जामिनावर बाहेर आला. दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण प्रकरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते.
समाजकारणातून राजकारणातील एन्ट्रीची महत्वाकांक्षा
गुंडगिरीचा धंदा असूनही शरद मोहोळला राजकारणाचे वेध लागले होते. त्यानी आपली प्रतिमा निर्मिती करण्यासाठी सामाजिक कार्यक्रम सुद्धा राबवण्यास सुरुवात केली होती. मात्र, राजकारणातील प्रवेश होण्यापूर्वीच आता त्याचा दिवसाढवळ्या गेम झाला आहे. शरद मोहोळवर हल्ला कुणी केला? हल्ला पूर्ववैमन्यस्यातून झाला का? याची अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
शरद मोहोळ हा किमान 15 गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकला होता. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून 2012 मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून 2019 मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी 2010 मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 2021 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
किशोर मारणे हा गणेश मारणेचा जवळचा सहकारी होता, ज्याला पौड रोडवर 4 ऑक्टोबर 2006 रोजी गुंड संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी होता. गणेशला अटक झाल्यानंतर किशोरने टोळी चालवण्यास सुरुवात केली, पण किशोरला शरद मोहोळने संपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, शरद मोहोळच्या पत्नी स्वातीने भाजप प्रवेश केला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते.
इतर महत्वाच्या बातम्या