Pune Indrayani River pollution : Majha Impact! इंद्रायणी नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकांवर गुन्हा दाखल
आळंदीत इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचे वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. इंद्रायणी नदी पात्रात रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Indrayani River pollution : देवाच्या आळंदीत (Alandi) इंद्रायणी नदी प्रदूषीत झाल्याचे वृत्त एबीपी माझानं दाखवलं होतं. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. आळंदीमधील इंद्रायणी नदी पात्रात रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकावर गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या घरगुती सांडपाणी वाहिन्यांद्वारे कंपन्यातील रसायनयुक्त पाणी नदी पत्रात सोडल्याचा ठपका त्या कंपन्यांवर लावण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या पात्रात रसायनयुक्त पाणी सोडलं जात होतं. त्यामुळे नागरिकांनी देखील तक्रारी केल्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी एबीपी माझाने ही बातमी प्रसारित केली होती. त्यानंतर पुण्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी आळंदीच्या इंद्रायणी नदीची पाहणी केली होती. त्यांनी नदीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. नदीपाठावरील विविध गावांमधील पाण्याचे नमुने त्यांनी तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात असणाऱ्या सहा कंपनी मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. महापालिकेच्या जलनि:सारण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
इंद्रायणी नदीवर रसायनयुक्त पाण्याचा फेस तयार झाला आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषीत झाली आहे. नदीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या सगळ्या अनाधिकृत कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. लोणावळा शहरातून या इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्या दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत कंपन्या आहेत. या कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेलं रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जातं. त्यामुळे नदीत प्रदूषण पसरत आहे. या प्रदुषणामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वारकऱ्यांच्या मागणीला यश
मागील अनेक वर्षांपासून इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे. दरवर्षी वारकरी मोठ्या प्रमाणात आळंदीत येत असतात. लाखो वारकरी संजीवन समाधी सोहळा, आषाढी आणि कार्तिकी एकादशीला आळंदीत दाखल होतात. या प्रदुषित पाण्यात वारकरी स्नान करतात. हेच पाणी तीर्थ म्हणून पितात त्यामुळे नदीतील पाणी स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. प्रदुषित पाण्यामुळे वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदीतील प्रदुषण दूर करा आणि ज्या अनाधिकृत कंपन्यांकडून दुषित पाणी सोडलं जातं त्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी मागील अनेक महिन्यांपासून वारकऱ्यांकडून केली जात होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आलं आहे.