Vidhan Parishad Election 2025 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची भाऊगर्दी, 100 हून अधिक अर्ज, एका नावाची जोरदार चर्चा, पण...
Vidhan Parishad Election 2025 : 27 मार्चला विधानपरिषदेसाठी पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे.

Vidhan Parishad Election 2025 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक (Vidhan Parishad Election 2025) जाहीर झाली आहे. 27 मार्चला विधानपरिषदेसाठी मतदान होणार आहे. यात भाजपच्या (BJP) तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Faction) एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) एका आमदारासाठी ही निवडणूक पार पडणार आहे. मात्र या निवडणुकीआधी अजित पवारांची (Ajit Pawar) डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. या पाच जागांसाठी हे मतदान होणार आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या असून या पाच जागांसाठी आता 27 मार्चला निवडणूक होणार आहे.
100 हून अधिक अर्ज
17 मार्च रोजी या निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे. तर विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे शंभर जणांनी विनंती अर्ज केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दोन विधान परिषदेच्या जागा आहेत. त्यापैकी एक जागा राज्यपाल नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळणार आहे. तर दुसरी जागा विधान परिषदेमध्ये आमदारांमधून निवडून जाणारी जागा आहे. त्यासाठी देखील इच्छुकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शंभर पेक्षा जास्त विनंती अर्ज आलेले असताना पक्षांतर्गत अद्याप याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.
एका नावाची जोरदार चर्चा, पण...
राष्ट्रवादी पक्षाने विधिमंडळाकडून चार अर्ज घेतलेले आहेत. त्यातील एका अर्जावर अंतिम निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक येत्या दोन दिवसात होणार आहे. या बैठकीत कोणाला विधानपरिषद द्यायची याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीआधी झिशान सिद्दीकी यांनी त्यांच्या वडिलांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या वडिलांचा दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर झिशान सिद्दिकी यांचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानसभेत उमेदवारी देखील दिली होती. मात्र झिशान सिद्दिकी यांचा पराभव झाला. यानंतर ते विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून देखील या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाकडे या जागेसाठी विनंती केलेली आहे. तर संग्राम कोते पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांनी या जागेसाठी विनंती केली आहे. मात्र अद्याप अजित पवारांकडून यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. आता ही जागा नेमकी कोणत्या नेत्याच्या वाटेला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
























