बंदी झुगारुन सहलीसाठी लोणावळ्यात, विनापास 131 जणांवर गुन्हा तर विनामास्क पर्यटकांकडून 64 हजारांचा दंड
बंदी असतानाही काही पर्यटक जीव धोक्यात घालून लोणावळ्यात येत होते. अशातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पर्यटक लोणावळ्यात पोहोचले. पण त्यांची ही हौस पोलिसांनी भागवली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
पिंपरी चिंचवड : कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन असताना लोणावळ्यात वर्षा सहलीसाठी येणं पर्यटकांना महागात पडलं आहे. असा उतावीळपणा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विनापास आलेल्या 131 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बंदी झुगारल्याप्रकरणी 51 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय विनामास्क आलेल्या 129 पर्यटकांकडून तब्बल 64 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आधीच जीव धोक्यात घालून काही पर्यटक लोणावळ्यात येत होते. अशातच शनिवारी (4 जुलै) भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे पर्यटकांना राहावेना आणि ते लोणावळ्यात आले. पण त्यांची ही हौस पोलिसांनी भागवली. पर्यटकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीचे दिलेले आदेश धुडकवल्याने 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विना मास्क फिरल्याने दंडाची कारवाईही करण्यात आली आहे.
पोलिसांची उतावीळ पर्यटकांवर कारवाई
विनापास आलेले - 131 गुन्हे बंदी झुगारुन आलेले - 51 गुन्हे विनामास्क आलेल्या 129 पर्यटकांकडून 64 हजार 500 दंडपर्यटनस्थळांवर बंदी कायम : जिल्हाधिकारी लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असली तरी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पर्यटनस्थळांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस होतो. मावळ तालुक्यात भुशी धरण, लोणावळ्यातील विविध पॉईंट्स, गड-किल्ले, लेण्याद्री. मुळशी तालुक्यातील मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट परिसर. हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण आणि गड-किल्ले परिसर. तर वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण आणि परिसरात वर्षापर्यटनासाठी मोठी गर्दी होते. मुंबई, पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची पर्यटनासाठी या धरणांना पसंती असते. प्रत्येक विकएण्ड आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुण्यासह बहुतांश जिल्ह्यातील पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी उसळते. या धरण आणि इतर भागात नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणा-या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. अशातच कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राम यांनी पुढील आदेशापर्यंत पर्यटनाला बंदी कायम ठेवली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे पुणे-मुंबईच्या पर्यटकांचा यंदा हिरमोड झाला. परंतु तरीही काही उतावीळ पर्यटकांनी या आदेशाचं उल्लंघन करत लोणावळा गाठल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.