Amravati : मतदानाच्या दिवशीच आनंदराज आंबेडकरांनी निवडणुकीतून माघार घेतली? अमरावतीत अफवांचे पेव, अनेकांवर गुन्हा दाखल
Anandraj Ambedkar : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवाविरोधात रिपब्लिकन सेनेने काँग्रेसच्या जिल्हा सहसचिवासह अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती : मतदानाचा दिवस उजाडला असताना अमरावतीमध्ये अफवांचे पेव फुटलं आहे. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी अमरावतीमधून त्यांची उमेदवारी माघार घेतल्याची खोटी पोस्ट व्हायरल होत आहे. या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हा सहसचिव अजय बद्रीया यांच्यासह आणखी एकावर दर्यापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा फेक न्यूजवर कुणीही विश्वास ठेऊ नका, अन्यथा मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांवरही गु्न्हा दाखल करण्यात येईल असा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.
अमरावतीसाठी आज मतदान
अमरावती लोकसभेकरिता आज, शुक्रवार मतदान होणार असून सर्व राजकीय पक्षांचा प्रचार शुक्रवारी थांबलेला आहे.पण यादरम्यान आता सोशल मीडियावर सर्व उमेदवारांचा प्रचार हा जोमाने सुरू आहे. यातच रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर गुरुवार सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हा सहसचिव अजय बद्रीया यांच्यासह अनेकांवर आनंदराज आंबेडकर यांनी माघार घेतल्याची पोस्ट व्हायरल केलेली आहे. मात्र आनंदराज आंबेडकर यांनी कुठेही माघार घेतली नाही असं स्पष्ट केलं. विरोधकांकडून जाणूनबुजून अशी अफवा पसरविल्या जात आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी म्हटलंय.
मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यावरही गुन्हा दाखल करणार
या प्रकरणी आनंदराज आंबेडकरांनी म्हटलंय की, "आपल्या नावार अशी अफवा पसरवली जात आहे. या प्रकरणी आपण अमरावतील पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. ज्याने कुणी ही अफवा पसरवलीय आणि जो कोणी अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करतील त्यांच्यावरही गु्न्हा दाखल करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नये. आपण लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली नाही."
रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सचिव श्रीपती ढोले यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे काँग्रेसचे जिल्हा सहसचिव अजय बद्रीया यांच्यासह अनेकांविरोधात खोटी पोस्ट व्हायरल केल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी विविध कलमानुसार काँग्रेसचे अजय बद्रीया यांच्यासह ज्यांनी ज्यांनी ही पोस्ट व्हायरल केली आहे अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल केलेला आहे.
अमरावतीमध्ये भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, प्रहारकडून दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
ही बातमी वाचा: