अजितदादांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले
Rajan Patil meets Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
अकलूज : नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला होता. मात्र, तेच राजन पाटील आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय? असा सवाल राजन पाटील भेटीसाठी पोहोचल्यानंतर केला आहे. जरी मला अजित पवारांनी महामंडळाचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे. लोकसभेला जनतेने काँग्रेससाठी मतदान केले असा गौप्यस्फोटही राजन पाटील (Rajan Patil) यांनी केला.
काही दिवसांपूर्वी मोहोळमध्ये झाली होती अजित पवारांची सभा
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राजन पाटील यांच्या मोहोळमध्ये सभा घेत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. राजन पाटील यांना विरोध करणाऱ्या उमेश पाटील यांना अजित पवारांनी झाप झाप झापलं होतं. मात्र, तरी देखील राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी आल्यानं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
माजी आमदार रमेश कदमही शिवरत्न बंगल्यावर
मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी अकलूज येथे दाखल झाले आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढावी. त्यामुळे मी शरद पवार साहेबांना मोहोळमधून उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास मी मोहोळमधून तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असंही रमेश कदम यांनी सांगितले आहे.
इंदापूरमधील नेते मंडळीही मोहिते पाटलांच्या बंगल्यावर
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील नको म्हणणारे आप्पासाहेब जगदाळे, दशरथ दादा माने आणि इतर मंडळीही शिवरत्न बंगल्यावर पोहोचली आहेत. सकाळी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याशी बैठक करून हर्षवर्धन पाटील नको. ही भूमिका मांडल्यानंतर पुन्हा अकलूजमध्येही हर्षवर्धन पाटील विरोधक पोहोचल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. 2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटलांसमोर दिलेला शब्द पाळावा हीच आमची मागणी असून आमचा त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यांना शरद पवार गटात यायचं असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र त्यांनी अधिक काम करावे आणि नंतर उमेदवारीवर दावा करावा अशी भूमिका आप्पासाहेब जगदाळे यांनी बोलून दाखवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला