शरद पवार माझ्यासाठी आदर्श,पण...; रोहित पवारांच्या मंत्रिपदावरुन प्रफुल्ल पटेलांचा खोचक टोला
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे जनसन्मान यात्रेमध्ये भाषण करताना अनावधानाने शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आला होता.
भंडारा : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, पण रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. कारण, पहिल्याच मंत्रिमंडळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना मंत्रिपदाची संधी मिळाली होता. आता, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असे संकेतच खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad pawar) यांनी दिले आहेत. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार (Rohit Pawar) हे मंत्री असतील असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर्स झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull patel) यांना विचारले असता, त्यांनी खोचक टोला लगावला.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे जनसन्मान यात्रेमध्ये भाषण करताना अनावधानाने शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असलो तरी शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे. मी त्यांना आपला गुरु मानतो, आणि त्यानुसारच काम करतो. त्यामुळे, त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. मात्र, आमदार रोहित पवार यांच्या मंत्रिबाबत बोलताना त्यांनी खोचक टोलाही लगावला. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री बनतील, असे पटेल यांनी म्हटले.
रोहित पवार यांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि पुढील पाच वर्षात ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी टोला लगावला. प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. परंतु, त्यांची सत्ता येईल, तेव्हाच ते मंत्री करतील, असा टोला पटेल यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर लगावला.
मुख्यमंत्रीपदाबात काय म्हणाले रोहित पवार
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी त्यांचे "भावी मुख्यमंत्री" असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. जामखेडच्या खर्डा येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आगामी काळात मंत्री होण्याचे संकेत स्वत: शरद पवार यांनी दिले. दरम्यान, रोहित पवारांच्या समर्थकांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होतो याबाबत विचारले असता, मलाच विशेष वाटते की लोक एवढ्या मोठ्या पदाबाबत माझ्या नावाची चर्चा करतात. हे जनतेचे प्रेम आहे, पण बॅनर लावून काही होत नसतं, त्यासाठी खूप काम करावं लागते. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही, तर महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी काम करतो, असे रोहित पवारांनी म्हंटले.