Bhushan Pradhan On Chhaava Movie: 'छावासाठी मला विचारणा झाली होती, पण...'; नाकारलेल्या भूमिकेबाबत काय म्हणाला भूषण प्रधान?
Bhushan Pradhan On Chhaava Movie: मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान याला 'छावा'ची ऑफर झाली होती. पण, त्यानं ती नाकारली, असं स्वतः भूषणनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे.

Bhushan Pradhan On Chhaava Movie: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा'नं (Chhaava Movie) बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवून सोडलं आहे. बक्कळ कमाई करणाऱ्या 'छावा'च्या धमाकेदार परफॉर्मन्समध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टचाही मोठा वाटा आहे. 'छावा'मध्ये विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, मुघल बादशाह औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे. अशातच या चित्रपटात अनेक मराठमोळ्या कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, रोहित पाठक, शुभंकर एकबोटे, किरण करमरकर, मनोज कोल्हटकर, आस्ताद काळे, आशिष पाथोडे, शिवराज वाळवेकर, संतोष जुवेकर यांसह अनेक कलाकार झळकले आहेत. तसेच, नीलकांती पाटेकर यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण, एक असा मराठी कलाकार आहे, ज्यानं 'छावा' सिनेमाची ऑफर मिळूनही ती नाकारली.
मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान याला 'छावा'ची ऑफर झाली होती. पण, त्यानं ती नाकारली, असं स्वतः भूषणनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, भूषणनं 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आजही भूषणनं साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होतंय. अशातच मुलाखतीत बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे, असंही भूषण म्हणाला आहे.
'छावा'मध्ये काम करण्याच्या ऑफरबाबत काय म्हणाला भूषण?
अभिनेता भूषण प्रधान म्हणाला की, "आपल्या नशिबात अनेक गोष्टी येतात पण, आयुष्यात आपण कशाला 'हो' म्हणतो आणि कशाला 'नाही' या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण, महाराजांची भूमिका साकारल्यावर माझ्याकडे इतर अनेक ऐतिहासिक भूमिका आल्या. 'छावा' चित्रपटातसुद्धा एका भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती. पण, मला असं लक्षात आलं की, आता मी महाराजांची भूमिका मालिकेच्या निमित्ताने एकदा साकारलीये. पण, केवळ हिंदी चित्रपट आहे म्हणून त्यातली कोणतीही भूमिका मी अशीच करणार नाही. अशावेळी 'नाही' बोलणं योग्य ठरतं. कारण, तो चित्रपट खूप मोठा होणार, आपण खूप लोकांपर्यंत पोहोचणार या गोष्टी माहिती होत्या. पण, तरीही मी माझी तत्त्व पाळली. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कारण, नुसतंच काम मिळतंय म्हणून 'हो' बोलायचं नसतं. हे मी माझ्या शिक्षणामुळे आणि अर्थात महाराजांची भूमिका साकारताना शिकलो."
"जय भवानी जय शिवाजी'च्या सेटवर शेवटचा दिवस होता तेव्हा..."
"आजवर मी विविध चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक सेटवर मला शेवटच्या दिवशी थोडं भावुक व्हायला होतं. पण, 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेच्या सेटवर जेव्हा शेवटचा दिवस होता तेव्हा यापैकी काहीच झालं नाही. मी माझ्या आई-बाबांना शेवटच्या दिवसाचं शूटिंग आहे असं सांगितलं त्यांचेही डोळे पाणावले. पण, मी नीट होतो… भावुक झालो नाही मला समजत नव्हतं असं का होतंय? मी खूप विचारात होतो आणि मला माझं उत्तर त्यातूनच मिळालं.", असंही भूषण प्रधान म्हणाला.
पुढे बोलताना भूषण प्रधान म्हणाला की, "महाराजांची भूमिका मिळण्यासाठी भाग्य लागतं. माझं असं झालं आयुष्यात ही मोठी संधी मिळाली तर, आपण ही भूमिका पुरेपूर जगायची. लोक काय बोलतील, कोणी इम्प्रेस होतंय का या गोष्टींकडे त्या क्षणाला लक्ष देणं आवश्यक नव्हतं. मला फक्त माझ्या भूमिकेला शंभर टक्के न्याय द्यायचा होता. प्रत्येक गोष्ट विचार करून करायची, प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून प्लॅनिंग करायचं या सगळ्या गोष्टी माझ्यात महाराजांची भूमिका साकारताना आल्या."
दरम्यान, सध्या 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'छावा' पुढे अनेक दिग्गजांच्या चित्रपटांनी गुडघे टेकले आहेत. रिलीज होऊन महिना उलटला तरी, अजूनही 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























