Ram Shinde : विधानपरिषद सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी फिरवली पाठ; चर्चांना उधाण
Ram Shinde : विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहिल्यानगर शहरात सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
अहिल्यानगर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2024) आज चौथ्या दिवशी विधानपरिषदेत भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत सर्व नेत्यांनी राम शिंदे यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. यानंतर आज अहिल्यानगर शहरात विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सत्कार सोहळ्याकडे भाजपच्याच नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अहिल्यानगर शहरातील माऊली सभागृहात राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. तर पोपटराव पवार, आ. सत्यजित तांबे, आ. हेमंत ओगले यांच्यासह सर्वपक्षीय नेते या सत्कार सोहळ्याला उपस्थित असल्याचे दिसून आले.
राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याकडे भाजप नेत्यांनी फिरवली पाठ
दुसरीकडे या सत्कार सोहळ्याला भाजप आमदारांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार शिवाजी कर्डीले, आमदार मोनिका राजळे यांची या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली नाही. शिर्डी येथे होणाऱ्या भाजप प्रदेश मेळाव्याच्या तयारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होत असल्याने सर्व आमदार त्या बैठकीसाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, भाजपच्याच नेत्यांची या सत्कार सोहळ्याला उपस्थिती नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
रोहित पवारांनी घेतली होती राम शिंदेंची भेट
दरम्यान, राम शिंदे यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या समोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांचे आव्हान होते. निवडणुकीच्या दरम्यान रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. या निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. मात्र शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती निवड झाल्यानंतर रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली. रोहित पवारांनी राम शिंदेंना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. या भेटीचे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
आणखी वाचा