Navneet Rana : नवनीत राणांनी स्विकारला उद्धव ठाकरेंचा चॅलेंज, पण घातली ही अट!
काश्मिर येथे जाऊन हनुमान चालीसा म्हणा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राणा दामपत्याला दिले होते. यावर नवनीत राणा यांनी हे चॅलेंज स्विकारले असून यासाठी 'एक' अट त्यांनी ठेवली आहे.
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राणा दामपत्य यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाही आहे. हनुमान चालीसा म्हणायची असेल तर काश्मिरमध्ये जाऊन म्हणा असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना फटाकरून काढलं होतं. पण, आता नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज स्वीकारलं आहे.
औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि नाहक वाद घालणाऱ्या राणा दाम्पत्यांना फटकारून काढलं होतं. आज नवनीत राणा मुख्यमंत्र्यांच्या सभेवर आपली प्रतिक्रिया दिली. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिले होते त्यावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले आहे. मात्र, आधी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा कधी वाचणार? ज्या दिवशी मुख्यमंत्री हनुमान चालीसा वाचणार, त्यानंतर त्याच दिवशी आम्ही तारीख जाहीर करू असे प्रति आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले...
'काश्मिरी पंडितांनी पुन्हा घरे सोडली आहेत. घर, शाळा, कार्यालयात जावून गोळ्या घालत आहेत. पण कुणालाच काही पडलेली नाही. हिंमत असेल तर तिकडे काश्मीरमध्ये जावून हनुमान चालीसा पठण करा. उगाच कुठेतरी दुधाचा अभिषेक करताय. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाही. काश्मिरी पंडितांची आधी रक्षा करा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्याला लगावला.
'ही शिवसेना शिवसेनाप्रमुखांची नाहीय, अशी टीका करतात. मग कुणाच आहे? मी उद्धव ठाकरे म्हणून शुन्य आहे. मागे बाळासाहेब नाव आहे म्हणून मी तुमच्यासमोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आहे म्हणून तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता. माझ्या भाषणाला येत आहात. उद्धव ठाकरे हा शुन्य आहे. बाळासाहेबांनी जे हिंदुत्व शिकवलंय ते बरोबर आहे. त्यावरुन आता आंदोलन सुरु झालं आहे. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नाही तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
'बाबरी पाडण्याचा निर्णय शिवसेना ओरडून सांगत होती की, विशेष कायदा करा आणि राम मंदिर बांधा. तुम्ही धाडस केलं नाही. कोर्टातून तो आदेश आला. म्हणून राम मंदिर आता उभं राहतंय. जनतेसमोर झोळ्या पसरवून पैसे मागून ते राम मंदिर उभं राहतंय. हिंदुत्वासाठी तुमची भूमिका काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.