(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा इम्पॅक्ट | नवी मुंबई कोविड टेस्टिंग सेंटर घोटाळा प्रकरण; कोविड टेस्टिंग इंचार्ज डॉ. सचिन नेमाणे निलंबित
पुढील तपासासाठी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून उपायुक्त योगेश कडूसकर नेतृत्वात एका तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग सेंटरमधील घोटाळा प्रकरणी शहराचे कोविड टेस्टिंग इन्चार्ज डॉ. सचिन नेमाणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी ही कारवाई केली आहे. यासोबतच पुढील तपासासाठी आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून उपायुक्त योगेश कडूसकर नेतृत्वात एका तीन सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडाभरात अहवाल सादर करुन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
कोरोना व्हायरसचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढतो आहे. तो रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनाने जोरदार तयारी देखील केली आहे. हे सर्व एकीकडे सुरू असताना सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनांमध्येही भ्रष्टाचार सुरू आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेलं वैद्यकीय तपासणी कक्षात हा घोटाळा उघडकीस आला आहे. कोरोनाची महाराष्ट्रात सुरुवात झाली तेव्हापासून याठिकाणी रुग्णांची टेस्ट करण्यात येत आहे. आजवर हजारो रुग्णांची तपासणी याठिकाणी करण्यात आली आहे. वरवर जरी हे सगळं ठीक दिसत असलं तरी हे एक भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे, असं म्हटलx तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.
एबीपी माझाने माहिती घेतली असता कळालं की एका मुलाची कोविड टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांची देखील नावे लिहून घेण्यात आली होती. वरकरणी हा सगळा प्रकार कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी केला गेला असेल असा आपला समज होईल. मात्र रोहित खोत या मुलाने सांगितलं की, मी 9 ऑक्टोबरला टेस्ट केली. त्यावेळी माझ्याकडून माझ्या कुटुंबियांची देखील नावे लिहून घेण्यात आली. त्यावेळी माझ्यासोबत कुणी नव्हतं. आमच्या घरातील कोणाचीही टेस्ट करण्यात आलेली नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र माझ्याकडून नावे घेऊन त्यांची टेस्ट करण्यात आली असल्याचं दाखवण्यात आलं.
असा प्रकार खरंच होतोय का हे पाहण्यासाठी कोपरखैरणे परिसरात राहणारे समाजसेवक अंकुश कदम यांनी काही डमी लोकांना विविध कोविड सेंटरमध्ये पाठवलं आणि समोर एक धक्कादायक प्रकार आला. विशाल कदम यांनी सांगितलं की, माझी आई मृत आहे. मी जाणूनबुजून माझ्या आईचं नाव दिलं. धक्कादायक म्हणजे तिची देखील यांनी टेस्ट केल्याचा रिपोर्ट दिला आहे. ऋषिकेश रवले यांनीही तसंच केलं, त्यांनीही त्यांच्या वडिलांचं नाव दिलं. त्यांचे वडील जाऊन 8 वर्षे झाली होती आणि त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. हा संपूर्ण प्रकार जर पहिला तर नक्कीच तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. हे हिमनगाचं टोक असून मागील 9 महिन्यांचा विचार केला तर मोठा भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता आहे.
मी अनेक कुटुंबियांना भेटलो आहे. यामध्ये एकाची टेस्ट करून त्याच्या घरच्यांचे खोटे रिपोर्ट करण्यात आले आहेत. नवी मुंबई आयुक्तांची या प्रकरणी चौकशी व्हावी अन्यथा आम्ही आंदोलन करू, असं सामाजिक कार्यकर्ते अंकुश कदम यांनी सांगितलं. तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलं.
Corona fake test | नवी मुंबई कोविड सेंटरमधील घोटाळ्याप्रकरणी कारवाई होणार, आरोग्यमंत्र्यांची ग्वाही