(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : गंगापूर धरणातून पहिल्यांदा 539 क्यूसेकने विसर्ग सुरू, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार, नाशिकवर अवकृपाच
Nashik News : नाशिकमध्ये अनेक भागात दमदार पावसाची प्रतिक्षा असली तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची (Rain) प्रतीक्षा अजूनही आहे. पण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून शुक्रवार (28 जुलै) रोजी 539 क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात पुरपरिस्थिती उद्भवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय मुंबईसह राज्यातील अनेक भागातील शाळांना सुट्ट्या देखील देण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे नाशिकला पावसाने सतत हुलकावणी दिली आहे. ढगाळ वातावरण असूनही पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही वेळा मुसळधार सरी कोसळत असल्याने इगतपुरी तालुक्यातील धरणे भरली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी दुपारी 12 वाजता 539 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
गंगापूर धरण तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा जोर चांगला असल्याने गंगापुर धरणासाठ्यात वाढ होत आहे. आजमितीस गंगापूर धरणात 69 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे धरणतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. भावली धरण 100 टक्के भरले असून त्यातून 701 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर दारणा धरण 78 टक्के भरले असल्याने त्यातून 6569 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या या धरणामधून 3955 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अद्यापही नाशिक जिल्ह्यातील 24 प्रकल्पापैकी 13 धरणे 50 टक्क्यांच्या खाली आहेत.
नाशिकला दमदार पावसाची प्रतिक्षा
पावसाचा दुसरा महिना उलटत चालला असून अद्यापही नाशिक जिल्ह्यावर पावसाची अवकृपा असल्याचे चित्र आहे. मात्र इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर सुरगाणा, पेठ आदी तालुक्यात बरा पाऊस असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भात लावणीची लगबग सध्या या तालुक्यात सुरू आहे. पण तरीही नाशिक शहरासह इतर तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून नाशिककरांना सध्या मोठ्या पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.