Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्याचा आग्रह, गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, उरुस आयोजकांचे स्पष्टीकरण
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहरात उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून याचवेळी मंदिरात धूप दाखविण्याचा आग्रह सेवेकऱ्यांकडून केला जातो.
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwer) उरुसाची परंपरा अनेक वर्षांपासूनची असून उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwer City) उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. त्या दिवशी धूप दाखवण्यासाठी आलो होतो, उत्तर दरवाजाजवळ जाऊन धूप दाखवण्याचा आग्रह होता. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, मात्र यंदाच हा वाद का? असा सवाल उरुस (Urus) आयोजकांनी उपस्थित केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक (Nashik) शहराजवळील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यावरुन वाद उद्भवला आहे. मात्र हा वाद त्याच दिवशी निवळल्याचे सांगण्यात आले. मात्र देवस्थानकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी देखील दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत हा वाद गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट करत वाद मिटल्याचे सांगितले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे आतापर्यंत मौन बाळगून असलेल्या उरुस आयोजकांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या दर्ग्यात दरवर्षी उरुस भरतो. दर्ग्याला चादर चढवल्यानंतर डोक्यावर फुलांच्या माळा आणि चादर घेऊन त्र्यंबकेश्वर नगरीतून मिरवणूक काढली जाते. यंदा देखील याच पार्श्वभूमीवर उरुसाची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर (Trimbaeshwer Mandir) मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात, अशी अनेक वर्षांपासूनची परंपरा असल्याचं उरुसाचे आयोजक सांगतात. त्या दिवशी सुद्धा धूप दाखवण्यासाठी आलो होतो. उत्तर दरवाजाजवळ जाऊन धूप दाखवण्याचा आग्रह होता. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याचा प्रयत्न नव्हता, असे स्पष्टीकरण उरुसचे आयोजक मतीन सय्यद यांनी एबीपी माझाशी फोन बोलताना दिले, मात्र कॅमेरासमोर बोलण्यास टाळाटाळ केली.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणासंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात काही व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचे असल्याचा दावा केला जात आहे. ज्यात इतर धर्मियांना हटकण्यात आल्याचे दिसत आहेत तर काही व्हिडीओमध्ये तरुण उत्तर दरवाजा ओलांडून धूप दाखवताना दिसत आहेत, मात्र ते व्हिडीओ कधीचे आहेत हे स्पष्ट होत नाही. पोलीस तपासात त्याची सत्यता उघडकीस येण्याची शक्यता आहे. उरुस आयोजकांनी सांगितलं की, दरवर्षी आम्ही अशाप्रकारची मिरवणूक काढतो आणि देवाला धूप दाखवतो आणि तिथून पुढे आमची मिरवणूक मार्गस्थ होते. मागच्या वर्षीही त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी वाद झाला नव्हता, याच वेळी वाद का निर्माण होतोय? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जात आहे.