Nashik Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीनं घुसण्याचा प्रयत्न, देवस्थांनकडून पोलिसांना पत्र, काय घडलं नेमकं?
Nashik Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
Nashik Trimbakeshwer Mandir : अकोला, अहमदनगरच्या (Ahmednagar) शेवगाव येथील घटनेनंतर त्र्यंबकेश्वर येथील (Trimbakeshwer) मंदिरात प्रवेश करण्यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwer Mandir) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावरून तणाव निर्माण झाल्याचे समजते आहे. मात्र पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असला तरी मंदिर प्रशासनाकडून या घटनेच्या चौकशीसाठी पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठा वाद झाल्याची घटना घडली. त्यांनतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. हे वाद शमत नाही तोच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात काही जणांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. 13 मे रोजी ही घटना घडली असून मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांनी वाद घालणाऱ्या जमावाला रोखले. त्यांनतर पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. मात्र त्यांनतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग देवस्थानने पत्र दिल्याचे समजते आहे.
राज्यातील अनेक भागांत तणावाची परिस्थिती असताना त्र्यंबकेश्वरमध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास काही लोकांचा जमावाने मंदिरात जाण्याची विंनती केली होती. यावेळी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले, मात्र जमावाने मंदिरात जाण्याचा हट्ट धरला. यानंतर पोलिसांसह स्थानिक मंदिर प्रशासनाने जमावाची समजूत घालत हा प्रकार निवळला होता. मात्र त्यानंतर आता देवस्थान ट्रस्ट आणि ब्राम्हण महासंघाबरोबर इतर संघटनांकडून पोलिसांना पत्र व्यवहार केला जात आहे. घडलेली घटना गंभीर असल्याने यात कोण लोक होते? त्यांना मंदिरात प्रवेश का करायचा होता? अशा स्वरूपाची माहिती मंदिर प्रशासनाने पोलिसांकडून मागितली आहे. त्याचबरोबर संबंधितांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान मंदिरात ज्या लोकांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला, संबंधित लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाही.
नेमकं काय घडलं त्र्यंबकेश्वर मंदिरात?
त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirlinga) मंदिर हे सायंकाळी नऊ वाजता बंद करण्यात येते. उत्तर दरवाजाच्या ठिकाणी हा जमाव आलेला होता. यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केलेली होती. परंतु त्यांना प्रवेश हा नाकारण्यात आला. त्यामुळे एका बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा हट्ट आणि दुसरीकडनं सुरक्षा रक्षकांकडून त्यांना केला जाणारा मज्जाव, त्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवस्थानला माहिती मिळाल्यांनतर देवस्थानचे इतर व्यक्ती तिथे आलेले होते आणि त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलेले होते, परंतु त्यानंतर हा वाद मिटलेला होता. मात्र पुन्हा देवस्थांनकडून पोलिसांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.