Maratha Reservation : 20 जानेवारीपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार, गिरीश महाजनांचा मोठा दावा
Maratha Reservation : महिन्याभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईत उपोषणासाठी येण्याची वेळ पडणार नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.
नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आपण मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानावर उपोषण करणार असून, यासाठी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर मंत्री गरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे यांना 20 जानेवारीला मुंबईकडे येण्याची गरज पडणार नाही. कारण त्यापूर्वी मराठा आरक्षणा विषय सरकार मार्गी लावणार असल्याचं महाजन म्हणाले आहे. नांदेड येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी बीडला सभा घेतली. या सभेत त्यांनी 20 जानेवारी ची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय न झाल्यास आम्ही मुंबईला येऊन उपोषण करणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. मात्र, मी त्यावेळी देखील सांगितलं आणि आज ही सांगतोय, मनोज जरांगे यांच्यावर मुंबईत जाण्याची वेळच येणार नाही. कारण सरकार अतिशय वेगाने काम करत आहे. सोबतच मागासवर्गीय आयोग आपलं काम अतिशय वेगाने करत आहे. एकदा त्यांचा अहवाल आला की, विधानसभेचा अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे स्पष्टपणे सांगितले आहे. सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. मराठा आरक्षणाबाबत वेगाने काम होत आहे. महिन्याभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे मनोज जरांगे यांना मुंबईत उपोषणासाठी येण्याची वेळ पडणार नाही,” असे महाजन म्हणाले.
जागावाटपाचा निर्णय दिल्लीत होणार...
लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा शिंदे गटाला दिले जाणार तेवढ्याच अजित पवार गटाला देण्याची मागणी अजित पवार गटाकडून केली जात आहे. यावर बोलतांना गरीश महाजन म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपेचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरचा आहे. यावर जो काही निर्णय आहे तो दिल्लीतच होईल. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते देखील असतील. जागा वाटपाचा प्रश्न अजून तरी आमच्यासाठी वादाचा विषय नाही. आमच्याकडे सध्या अतिशय चांगलं वातावरण आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आहोत,” असे गिरीश महाजन म्हणाले.
हरिभाऊ राठोड यांच्या आरक्षणाचा प्रस्ताव जेरांगेंनी फेटाळून लावला...
माजी खासदार तथा ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा समाजाला कायदेशीर ओबीसीमधून कसे आरक्षण देता येणार याबाबतचा आपला फॉर्म्युला सांगितला. तब्बल अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली. मराठा समाजाला ओबीसीमधून 27 पैकी 10 टक्के आरक्षण देता येईल आणि बाकीचे ईतर ओबीसी समाजाला देता येईल. तसेच, राजकीय आरक्षणाच्या बाबतीत तीन भाग करून 9 टक्के आरक्षण भटक्या जाती-जमातींसाठी, 9 टक्के आरक्षण बारा बलुतेदारांसाठी आणि उरलेले 9 टक्के आरक्षण मराठा समाजासाठी देता येईल. परंतु, मनोज जरांगे यांनी हरिभाऊ राठोड यांचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. अर्ध्या मराठ्यांना आरक्षण देऊन उरलेल्या मराठ्यांना मी अंगावर घेऊ का? असे होणार नाही. आम्हाला संपूर्ण मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण हवे असल्याचे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: