Vidarbha Monsoon : विदर्भात मेघगर्जनेसह पुन्हा दमदार, नागपुरात दिवसभर सरींवर सरी
नागपुरात सोमवारीही पावसाची दमदार बॅटिंग राहणार आहे. मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचे अंदाज विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी ही 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
नागपूरः विदर्भासह नागपुरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह सकाळपासून पावसाला सुरुवात झाली तर दिवसभर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने सरी बरसल्या. नागपूरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. हवामान विभागानुसार चोवीस तासात विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली. सर्वाधिक म्हणजेच 108.4 मिमी पाऊस वर्धा जिल्ह्यात झाला. तर सर्वात कमी 7 मिमी पाऊस गोंदियामध्ये झाला.
वर्धानंतर 52.6 मिमी पाऊस चंद्रपूर, बुलढाण्यात 48 मिमी, गडचिरोलीमध्ये 37 मिमी, अकोल्यात 25.5 मिमी, अमरावतीमध्ये 13.4 मिमी, नागपूरात 16.4 मिमी, वाशिममध्ये 14 मिमी आणि यवतमाळमध्ये 25 मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारी नागपुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्यानंतरचे पुढील तिन दिवस येलो अलर्ट आहे. याअंतर्गत शहरातील बहुतांश भागात पाऊश होणार असल्याचा अंदाज आहे.
चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये 'रेड अलर्ट'
आज रविवारसह पुढील दोन दिवसांसाठी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत मुसळधार पावसासह मेघगर्जनेचाही अंदाज आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी सतर्कतेचे ठरणार आहे. तर त्यानंतर बुधवारी दोन्ही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
'या' जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट'
नागपुरसह वर्धा, गोंदिया, यवतमाळ आणि वाशिमसाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट असून शहरात दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यासोबतच मेघगर्जनाही होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मंगळवारी अकोला, बुलढाणा आणि वाशिमसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
वाचा