एक्स्प्लोर
सत्ता स्थापण्यासाठी पुन्हा भाजपसोबत कदापि जाणार नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपसोबत कदापि जाणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली.
शिवसेनेची नवी वाटचाल सुरु आहे, मला घिसाडघाई करायची नाही, सगळ्या निवडणुका समर्थपणे लढू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सत्तेतून बाहेर पडणार का?
शिवसेनेने भाजपसोबत महापालिका निवडणुकांसाठी जरी काडीमोड घेतला असला तरी युती राज्यात कायम आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडणार, हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय आक्रमकपणाने नाही, तर संयमीपणाने घेतला जाईल. आक्रमकपणा आणि संयमीपणाचा ताळमेळ कसा साधायचा ते बाळासाहेबांकडून शिकलेलं आहे. त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकीत शरद पवारांनी केलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरे बोलले. पवार भाकीतं करतात म्हणूनच त्यांना 'पद्मविभूषण' दिला गेलाय, असा टोला त्यांनी लगावला.
''नोटाबंदीमुळे जीव गेले, नोकऱ्या गेल्या, त्याचं काय?''
मोदींचा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय आवडला, त्याचं कौतुक केलं, पण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या केल्या का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
नोटाबंदीमुळे अनेकांचे जीव गेले, उद्योग कोलमडले, त्याचं काय, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मोदींनी 50 दिवसांची मुदत दिली होती, पण त्या मुदतीचं आता काय झालं, लोकांना त्याचा विसर पडलाय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रात निर्णय घेताना शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. भूसंपादन विधेयक, नोटाबंदी या निर्णयासाठी शिवसेनेला विश्वासात घेतलं नाही. मात्र जीएसटीसाठी अर्थमंत्री अरुण जेटलींनी विश्वासात घेतलं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
''सरकारकडून केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही''
गेल्या अडीच वर्षात सरकारने अनेक घोषणा केल्या. गृहनिर्माण धोरणाची घोषणा करताना मी स्वतः उपस्थित होतो. पण या घोषणांनंतर पुढे काय होतं, याची काहीही माहिती मिळत नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
कॅबिनेट बैठकीत सरकारने पारदर्शकता आणावी. विरोधी पक्ष नेते, पत्रकार यांनाही बैठकीत सहभागी करुन घेतलं पाहिजे, चिक्की कोण खातंय, ते आपोआप कळेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावला.
''युती तोडायची इच्छा नव्हती''
भाजपसोबत युती ही कौटुंबिक संबंधांमधून झाली होती. त्यांच्यासोबत भावनिक नातं होतं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, स्वर्गीय नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बाळासाहेबांच्या असलेल्या संबंधातून युती झाली होती. त्यामुळे युती तोडताना त्रास झाला, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
भाजपने जशी विधानसभेला युती तोडली, तशी शिवसेनेने महापालिकेसाठी तोडली, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
दरम्यान भाजपने युतीत 25 वर्षे शिवसेनेचा केवळ वापर करुन घेतला, असं सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. मोदींच्या वाईट काळात बाळासाहेब त्यांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले. पण भाजपची भूक आता वाढली आहे. मात्र मोदींची हवा आता ओसरली असून भाजपने आपली भूक आटोक्यात आणायला हवी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
''मनसे या विषयावर बोलायचं नाही''
युतीबाबत बोलताना मनसेवर बोलणं मात्र उद्धव ठाकरेंनी टाळलं. मनसे या विषयावर आपल्याला सध्या काहीच बोलायचं नाही. कारण शिवसेना पुढे गेली आहे, शिवसैनिक खुश आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
''मुख्यमंत्र्यांवर एकट्यावर प्रचाराचा भार''
मुख्यमंत्र्यांवर एकट्यावर प्रचाराचा भार पडलाय, राज्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. शिवाय त्यांना मुंबईचा विकास पाहायलाही वेळ नाही. केंद्राचा पारदर्शी कारभाराचा अहवाल न पाहताच ते आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा अहवाल पाहावा आणि मग बोलावं, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी आशिष शेलारांचाही नाव न घेता अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. त्यांना उत्तर द्यायला आमचे शाखाप्रमुखच पुरेसे आहेत, मी त्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत खुल्या चर्चेसाठी आजही तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
''किरीट सोमय्यांवर बोलणार नाही''
मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांबद्दल बोलणार नाही, असं स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्री, मोदी यांच्यावर बोलेन पण सोमय्यांवर काहीही बोलणार नाही, असं ते म्हणाले.
''हार्दिकसोबत राजकीय चर्चा झाली''
हार्दिक पटेल हा गुजरातमध्ये शिवसेनेचा चेहरा का असू नये?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. तो 'मातोश्री'वर आल्यानंतर त्याच्यासोबत राजकीय चर्चा झाली. तो केवळ 23 वर्षांचा आहे. अजून निवडणूकही लढवू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'मातोश्री'वर मोदी, अडवाणी आलेले चालतात, मग हार्दिक पटेल का नाही?,असा सवाल त्यांनी केला.
मुलाखतीतील मुद्दे
- शिवसेनेची नवी वाटचाल सुरु आहे, मला घिसाडघाई करायची नाही, सगळ्या निवडणुका समर्थपणे लढू
- मोदींचा सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय आवडला, त्याचं कौतुक केलं, पण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या, त्या केल्या का?
- नोटाबंदीमुळे जीव गेले, नोकऱ्या गेल्या, त्याचं काय?
- पारदर्शकता हा शब्द केंद्राच्या आर्थिक अहवालात, त्या अहवालात पाटणाचं नाव आहे, नागपूरचं नाही
- किरीट सोमय्यांबद्दल बोलणार नाही, मला मोदी किंवा फडणवीसांबद्दल विचारा
- सरकारने अडीच वर्षात फक्त घोषणा केल्या, एकाही प्रकल्पाची अंमलबजावणी नाही
- स्वतःचं धरण बांधून पाणी पुरवठा करणारी मुंबई देशातील एकमेव महापालिका
- मुंबई पाटणापेक्षा वाईट, हे कुणालाही पटणार नाही
- भाजपकडून मुंबईला बदनाम केलं जातंय, केंद्राचा अहवालात सत्य परिस्थिती
- केंद्राचे निर्णय होताना शिवसेनेला विश्वासात घेतलं जात नाही
- भाजपने जशी विधानसभेला युती तोडली, तशी महापालिकेला शिवसेनेने तोडली
- आक्रमकपणा असला तरी, नेमकेपणा सोडणार नाही
- कॅबिनेट बैठकीत पारदर्शकता आणा, विरोधी पक्षनेता, पत्रकार यांनाही सहभागी करा, चिकी कोण खातंय ते कळेल
- 25 वर्षांच्या युतीमुळे वैयक्तिक ऋणानुबंध जुळले होते, ती युती तोडायची नव्हती
- मोदींची हवा आता ओसरली आहे, भाजपने आपली भूक आटोक्यात आणावी
- काँग्रेस नको म्हणणारे जसे होते, तसेच भाजप नको आणि शिवसेना हवी म्हणणारेही आहेत
- हार्दिक पटेल हा गुजरातमध्ये शिवसेनेचा चेहरा का असू नये?
- हार्दिकसोबत राजकीय चर्चा झाली, तो वयाने लहान आहे,अजून निवडणूकही लढवू शकत नाही
- 'मातोश्री'वर मोदी, अडवाणी आलेले चालतात, मग हार्दिक पटेल का नाही?
- मनसे या विषयावर बोलायचं नाहीय, शिवसेना पुढे गेलीय, शिवसैनिक खुश आहेत
- शरद पवार भाकीतं करतात म्हणूनच त्यांना पद्मविभूषण दिलाय
- मुख्यमंत्र्यांवर एकट्यावर प्रचाराचा भार पडलाय,राज्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही
- मुख्यमंत्र्यांना मुंबईचा विकास पाहायला वेळच नाही
- आशिष शेलारांना आमचे शाखाप्रमुख उत्तर देतील
- मुख्यमंत्र्यांसोबत खुल्या चर्चेसाठी आजही तयार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement