एक्स्प्लोर
राज ठाकरेंना उत्तर भारतीयांचे पाच प्रश्न
राज ठाकरे 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या 2 डिसेंबर रोजी उत्तर भारतीयांच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. यावेळी राज ठाकरे परप्रांतियांविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. या कार्यक्रमात त्यांना उत्तर भारतीय नागरिक काही प्रश्नही विचारणार आहे. त्यापैकी काही प्रश्न एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. या प्रश्नांवर राज ठाकरे काय देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. राज ठाकरेंना उत्तर भारतीयांचे पाच प्रश्न 1) काहीही झालं तर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला मारण्या-झोडण्याचे आदेश का देता? मनसेकडून आम्हाला नेहमी मारहाण का होते? 2) महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा तुम्ही स्वत:ला संविधानापेक्षा मोठं समजता का? संविधानानुसार देशातला प्रत्येक नागरिक कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो, नोकरी, व्यवसाय करु शकतो, तर मग मनसेला संविधानापासून, कायद्यापासून त्रास आहे का? 3) कल्याणमध्ये रेल्वे भरतीला आलेल्या विद्यार्थ्यांना एवढ्या बेदमपणे मारहाण का करण्यात आली? आमच्या विद्यार्थ्यांना का मारलं? 4) फेरीवाले महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हप्ते देऊन आपली दुकानं लावतात, मग मनसे कायम फेरीवाल्यांवरच हात उचलते. तसं कधी BMC च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कधीच काही करत नाही. फक्त फेरीवाल्यांनाच मारहाण का ? 5) उत्तर भारतीय माणूस 8 ते 10 हजारात 12 –12 तास पडेल ते काम करतो, कष्ट करतो, दिवसभर काम करुनही रात्रपाळीही करतो. तसं तुमचा मराठी माणूस असं काम करेल का? साफसफाईची किंवा वॉचमन म्हणून काम करेल का ? दरम्यान, राज ठाकरे 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचाय संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होते, जे त्यांनी स्वीकारलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.
आणखी वाचा























