नवी मुंबई एपीएमसीमध्ये गर्दी होऊ लागल्याने वेळेत बदल, भाजीपाला मार्केट 8 तासांऐवजी 24 तास सुरु राहणार
एपीएमसीमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग नवी मुंबईसोबतच महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता असल्याने एपीएमसीमध्ये येणाऱ्या प्रत्येक घटकाची कोरोना चाचणी करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास एपीएमसीमध्ये होणारी गर्दी काही प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. भाजी मार्केट मध्ये 700 गाड्यांची आवक होत असल्याने सकाळच्या वेळेस 8 ते 10 हजार लोकांची एकाच वेळी गर्दी होत आहे. यामुळे कोरोना नियमांना हरताळ फासला जात आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पहाटे 2 वाजता सुरू होणारे भाजीपाला मार्केट उद्यापासून संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. महाराष्ट्र आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची येथे आवक होत असते. गर्दी विभागण्यासाठी 8 तासांऐवजी आता 24 तास भाजीपाला मार्केट सुरू राहणार आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून भाजीपाला घेऊन येणाऱ्या गाड्यांना मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. रात्री 10 वाजता व्यापारी वर्गाकडून व्यापर सुरू झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरात भाजीपाला पोहोचवणाऱ्या गाड्यांना प्रवेश मिळणार आहे.
Maharashtra New Corona Guidelines: मिशन ‘ब्रेक दि चेन’आदेशात सुधारणा, 'या' आवश्यक सेवांचा समावेश
नवी मुंबई एपीएमसीमध्ये भाजीपाला, फळे, कांदा- बटाटा, घाना आणि मसाला असे पाच मार्केट आहेत. पाच मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत असल्याने दिवसाला 7 ते 8 हजार गाड्यांची आवक आणि जावक होत असते. त्यामुळे हजारोच्या संख्येने माथाडी कामगार, व्यापारी, ट्रान्सपोर्टर, खरेदीदारांचा एपीएमसी मध्ये राबता असतो.
एपीएमसीमधून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग नवी मुंबईसोबतच महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता असल्याने एपीएमसीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. यासाठी ॲंटिजन टेस्ट सुविधा गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यास याचा मोठा फायदा कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :